विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवरून नाराजी समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले झिशान सिद्दिकी यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील काही पदाधिकारी या नियुक्तीच्या विरोधात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती झाल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे झिशान सिद्दिकी यांच्यावर मुंबईतील पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी आली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षातील काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. पक्षाने सोपवलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याने पक्षातील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे.
कांबळे यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्षाच्या नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त केला आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आपण मनापासून आदर करतो, असे सांगतानाच त्यांनी मुंबई कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये भावनिक शब्दांत भूमिका मांडली. ‘साथ सुटली दादांची, पण विचार अजून जिवंत आहे, पद सोडले जरी, तरी निष्ठेचा दिवा अखंड तेवत आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. या शब्दांतून अजित पवार यांच्याशी असलेले आपले नाते आणि पक्षातील पुढील वाटचालीबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
कांबळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून गेल्या 27 वर्षांपासून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अजित पवार यांनी आपल्यातील दलित चेहरा आणि सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेऊन वेळोवेळी ताकद दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पक्षात काम करण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात आपल्याला खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव होत असल्याचे कांबळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार पक्षाची धुरा ताकदीने आणि संयमाने सांभाळत आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भक्कम साथ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App