विशेष प्रतिनिधी
मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. Auto and taxi drivers
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी गुरुवारी (27 ऑगस्ट) एक वर्षाची मुदत दिल्यामुळे आता त्यांच्यावरची कारवाई टळली आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यावरून मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती. त्यानंतरही मराठी शिकलेले नसतील अशा चालकांवर 18 ऑगस्टपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. त्यावरून अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये प्रचंड नाराजी होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आज (27 ऑगस्ट) रिक्षा-टॅक्सीचालक संघटनेने त्यांची भेट घेतली. ही भेट भाजप ट्रान्सपोर्ट सेल महाराज्यचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यातही मराठी शिकण्याचा प्रयत्न करत राहू, असे स्पष्ट करून कमी वेळात मराठी शिकणे शक्य होत नसल्याने मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. ती मान्य करून त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या कालावधीत सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांनी व्यवहारापुरती जुजबी मराठी शिकण्याचे मान्य केले आहे.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
मुदतवाढीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, मराठी बोला, महाराष्ट्र जोडा हे आमचे धोरण असून आम्हाला दिलेल्या मुदतीत काही अडचणींमुळे मराठी शिकता आले नाही, हे भाजप ट्रान्सपोर्ट सेल महाराज्ये अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी स्पष्ट केले. आम्हाला मराठी शिकायचे आहे पण, पावसामुळे 25 दिवस वाया गेले, कधी क्लाससाठी हॉल मिळाले नाही. त्यामुळे मराठी शिकण्यात अडचण आली. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुदतवाढीची विनंती केली. आणि मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली. आता वर्षभरात आम्ही जुजबी नाही तर चांगली मराठी बोलू, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.
रिक्षा, टॅक्सी चालवणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी बोली किंवा जुजबी मराठी भाषा येणे आवश्यक आहे. यासाठी परिवहन विभागाने सामाजिक बांधिलकीतून 105 दिवसांचा विशेष उपक्रम राबवत 1 लाख 65 हजार 800 रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकवली. यासाठी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत होती. त्यानंतरही मराठी भाषा शिकलेल्या चालकांवर 18 ऑगस्टपासून कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी 1 हजार 268 टॅक्सी-रिक्षा चालकांवर नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अमराठी चालकांनी बंदची हाक दिली, मराठी रिक्षाचालकाला मारहाण केली. परिणामी वातावरण गढूळ झाले होते. त्यानंतर चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत आणि त्यानंतर गरज भासल्यास तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, असे परिवहनमंत्री यांनी स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. एक वर्षात त्यांना मराठी शिकावी लागेल आणि त्यानंतर कोणतेही कारण चालणार नाही. 12 ऑगस्ट 2026 च्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. आता मुदतवाढ दिल्यामुळे रिक्षा-ट्रॅक्सीचालकांना उत्तम मराठी शिकण्याची संधी मिळणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ देताना तुमच्याशी चर्चा केली होती, यावर मुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते आहेत, असे सांगून सरनाईकांनी उत्तर टाळले.
शिवसेना शिंदे गटाकडून बुधवारी (26 ऑगस्ट) बोरिवलीमध्ये ‘माय मराठी संवाद मराठी’ या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते अमराठी रिक्षाचालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यावेळी हजारो चालक उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप ट्रान्सपोर्ट सेल महाराज्यचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन थेट एक वर्षाची मुदतवाढ मिळवल्याने शिवसेना आणि भाजपमधील मतभेद समोर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App