विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवाची कारणे शोधून त्याचा सविस्तर अभ्यास करण्यात येईल. निवडणुकीतील मतदानाचा कल वेगळा होता. महायुतीतील पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. Chandrashekhar Bawankule
पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुणे आणि नागपूर या जागा यापूर्वी काँग्रेसकडे होत्या. यंदा त्या जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उणिवा राहिल्या असतील. त्या दूर करून पुढील निवडणुकीत या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करू. या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझी जबाबदारी मी स्वीकारली आहे.
नागपूर मतदारसंघात ३८ आमदार आहेत. हा मतदारसंघ केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाही. त्यामुळे पराभवासाठी त्यांना लक्ष्य करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरी आम्ही जिंकू शकतो. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम योग्य आणि पराभव झाला की मशीनमध्ये दोष, अशी भूमिका घेणे चुकीचे आहे. नागपूरमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आम्ही आघाडीवर होतो; मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे काँग्रेसचा विजय झाला, असा दावा त्यांनी केला.
मतदारयाद्या वारंवार बदलण्याऐवजी त्या अद्ययावत करण्यावर भर द्यावा. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाली होती. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी बोलताना स्वतःची उंची समजून घ्यावी. राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असा कौल दिला आहे. धंगेकर यांनी जनमत समजून घ्यावे. एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समजावून सांगावे, असे बावनकुळे म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील विजयाचा उल्लेख करताना त्यांनी लाड यांच्या विजयाचाही संदर्भ दिला.
अजित पवार यांच्या विमान अपघातामागील नेमके कारण जनतेसमोर आले पाहिजे. या प्रकरणाची चौकशी वेगाने आणि लवकर पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतसारख्या प्रकल्पांबाबत केलेल्या राजकीय भाषणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, राज्यात अशा प्रकारचे ५० प्रकल्प उभे राहिले तरी त्यांचा विचार केला पाहिजे. कोयना प्रकल्पामुळे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज मिळते. जलविद्युत प्रकल्प पर्यावरणपूरक असून कोळशापासून वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात राख निर्माण होऊन प्रदूषण होते. माझ्या घरावर दररोज किलोभर राख साचते, असेही त्यांनी सांगितले.
कर्जतचा प्रकल्प पुन्हा गेला, तर राज्याच्या विकासाला धक्का बसेल. भविष्यात राज्याला जलविद्युत प्रकल्पांची गरज आहे. कोळसा आधारित वीजनिर्मिती प्रकल्प कमी करण्यासोबतच झाडांचे संरक्षण आणि बाधित झाडांचे योग्य पुनर्वसन केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून दर मंगळवारी तालुकानिहाय आढावा घेतला जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे. सिमेंट रस्त्यांसाठीचा निधी दुष्काळी उपाययोजनांकडे वळविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ४० हजार कोटी रुपयांचा निधी दुष्काळासाठी वापरण्याचे नियोजन आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
विरोधकांनी केवळ राजकारण न करता दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पुढील आठ महिने शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये. अन्यथा संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल. बँकांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
चेतनानंद महाराज यांनी समाजातील उपेक्षित घटकांसह विविध आध्यात्मिक कार्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला. या वेळी ‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संत परंपरेची माहिती देणाऱ्या अशा उपक्रमांमधून चांगला समाज घडविण्यास मदत होते, असे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App