मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट; आझाद मैदानावरील आंदोलनासाठी कडक अटी!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने राजधानीतील आंदोलनांबाबत कठोर नियम लागू केले आहेत. गृह विभागाने तातडीची अधिसूचना जारी करून आझाद मैदान वगळता मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास बंदी घातली आहे.

आझाद मैदानातही एका दिवसासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार असून, त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही. एका आंदोलनासाठी जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांनाच परवानगी असेल.

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. या पार्श्वभूमीवर या अटी घालण्यात आल्या आहेत.

गृह विभागाच्या आदेशानुसार, मुंबईत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान हेच अधिकृत ठिकाण राहणार आहे. या मैदानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही भागात आंदोलन, धरणे, जाहीर सभा किंवा तत्सम कार्यक्रम घेता येणार नाही. आंदोलनासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या सीमा मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र यांच्याशी संबंधित आहेत. या निश्चित व्यवस्थेबाहेर आंदोलन करण्यास परवानगी नसेल. यामुळे मंत्रालय, विधान भवन, आझाद मैदानाबाहेरील प्रमुख रस्ते किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी मोठा जमाव करून आंदोलन करण्याचा पर्याय आंदोलकांसमोर राहणार नाही.

आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली तरी ती अमर्यादित नसेल. गृह विभागाच्या आदेशानुसार, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच आंदोलन करता येईल. सायंकाळी 6 नंतर आंदोलकांनी मैदान रिकामे करणे आवश्यक असेल. निर्धारित वेळ संपल्यानंतरही मैदानात थांबणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होऊ शकते. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंड आणि कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय आंदोलनाला एका दिवसापेक्षा अधिक काळ परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन करून मुंबईत दीर्घकाळ मुक्काम करण्याच्या शक्यतेवरही मर्यादा येणार आहेत.

नव्या नियमांमध्ये आंदोलनाच्या दिवसाबाबतही स्पष्ट अट ठेवण्यात आली आहे. शासकीय कामकाजाच्या दिवशीच आझाद मैदानात आंदोलन करता येईल. शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही. यामुळे 29 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबरच्या आंदोलनाच्या नियोजनावरही या नियमांचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तारीख शनिवार असल्याने सरकारने काढलेल्या आदेशातील ही अट महत्त्वाची ठरणार आहे.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


आझाद मैदानात आंदोलनासाठी जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांना परवानगी असेल. मराठा आणि ओबीसी समाजाकडून मुंबईत मोठ्या संख्येने नागरिक आणण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने ही मर्यादा महत्त्वाची आहे. मोठ्या संख्येने लोक मुंबईत दाखल झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने ही मर्यादा घातल्याचे मानले जात आहे. आंदोलकांनी आझाद मैदानातच जमावे आणि आंदोलन संपल्यानंतर तेथूनच बाहेर पडावे, अशीही अट घालण्यात आली आहे.

गृह विभागाच्या आदेशानुसार आंदोलकांनी आझाद मैदानात ठरलेल्या वेळेतच आंदोलन करायचे आणि त्यानंतर मैदान रिकामे करायचे आहे. आझाद मैदानापासून मंत्रालय, विधान भवन किंवा अन्य ठिकाणी मोर्चा काढण्याची परवानगी असणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य किंवा वाहने आणण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आझाद मैदानात ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहने किंवा प्राणी आणता येणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने वाहनांसह मुंबईत येण्याच्या नियोजनावरही मर्यादा येणार आहेत.

आंदोलनात घोषणाबाजी, भाषणे किंवा ध्वनिवर्धक वापरण्यासाठीही नियम लागू करण्यात आले आहेत. पोलिसांची विशेष परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे 9 बाय 6 फुटांपेक्षा मोठा बॅनर किंवा झेंडा वापरण्यास मनाई आहे. झेंड्याची काठीही 2 फुटांपेक्षा जास्त लांबीची असता कामा नये. याशिवाय लाठ्या, तलवारी, भाले किंवा तत्सम वस्तू आंदोलनस्थळी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणातील कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत येण्याची भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत गेले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगे यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे जरांगे अंतरवाली सराटीतून पुढे मुंबईकडे कूच करणार का, मुंबईत किती लोक येणार आणि आंदोलन किती काळ चालणार, याबाबत सरकारसमोर अनिश्चितता आहे.

Maharashtra Government Sets Conditions for Azad Maidan Protest After Manoj Jarange’s Warning

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात