विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणरायाच्या आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लालबागचा राजा मदतीला धावून आला आहे! गणपतीच्या आगमनाच्या जल्लोषात दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याने शोकसागरात बुडालेल्या भुलेश्वरच्या राजाला लालबागच्या राजाने ११ लाख रुपयांचा मदतीचा आधार दिला आहे. एवढेच नव्हे, तर दुर्घटनेत निधन झालेले मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करून दुःखाच्या क्षणी वडिलकीचा हात पुढे केला आहे. Bhuleshwarcha Raja
ही मदत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी जाहीर केली. भुलेश्वरच्या राजावर संकट कोसळले असताना लालबागच्या राजाने दाखविलेली ही तत्परता गणेश मंडळांमधील आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारी ठरली आहे..
गणरायाच्या आगमनाचा सोहळा भक्ती आणि उत्साहात साजरा होत असतानाच ही दुर्घटना घडली. आनंदाच्या क्षणावर अचानक दुःखाची काळी छाया पसरली आणि दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने भुलेश्वरचा राजा मंडळातील कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला.
या कठीण प्रसंगी भुलेश्वरच्या राजाच्या पाठीशी उभा राहिलेला लालबागचा राजा केवळ आर्थिक मदत करून थांबलेला नाही, तर ‘तुम्ही एकटे नाही’ हा भावनिक आधारही देत आहे. मंडळाला दिलेला ११ लाखांचा मदतनिधी आणि दिवंगतांच्या कुटुंबीयांना दिलेली प्रत्येकी पाच लाखांची मदत ही माणुसकीची जपणूक करणारी आहे. गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा उत्सव नसून माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा आहे. एका गणेश मंडळावर संकट आले असताना दुसऱ्या मंडळाने पुढे येऊन दिलेली ही मदत ‘एक मंडळ, एक कुटुंब’ या भावनेला अधोरेखित करणारी ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App