अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

अमरावती : अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर धूर पसरला. त्यावेळी एनआयसीयूमध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग लागताच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि अनेक मुलांना सुरक्षित बाहेर काढले. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग विझवली .



घटनेवर संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत 3 नवजात अर्भके मृत्युमुखी पडली तर आणखी काही गंभीर आहेत. ही अतिशय हृदयद्रावक घटना आहे. आई-वडील आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत असतात पण त्याच बालकाला अशा पद्धतीने गमावावे लागले तर त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनाही करता येत नाही. हा केवळ एक अपघात नाही तर व्यवस्थेतील गलथानपणाचा नमुना आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी. यासोबतच महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट तसेच वैद्यकीय साधनांचे सेफ्टी ऑडीट देखील करण्याची गरज आहे.

रोहित पवार म्हणाले की, अमरावतीत जिल्हा रुग्णालयाला आग लागून तीन नवजात बाळांचा होरपळून झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि तेवढीच संतापजनक आहे. सरकारी हॉस्पिटलमधील सुरक्षेचा मुद्दा वारंवार पुढं येत असतानाही सरकार याकडं का दुर्लक्ष करत आहे? सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे सामान्य कुटुंबातील माणसं असल्याने सरकारच्या लेखी त्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? अशाच घटना यापूर्वी राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयात घडल्या आहेत आणि त्यावेळी चौकशी आणि काहीतरी उपाययोजना करत असल्याचं सरकारकडून भासवलं गेलं पण नंतर पुढं काय झालं हे कधीही पुढं आलं नाही.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे.

Fire at Amravati District Women’s Hospital Claims Lives of Three Newborn Babies

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात