विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या ‘स्कूल ठीक करो!’ या देशभर आणि राज्यात सुरू असलेल्या मोहिमेनंतर राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा महिन्याभरात मूलभूत सुविधांनी सुसज्ज करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पाहणीमध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज व्यवस्था आणि वर्गखोल्यांची स्थिती तपासली जाणार आहे. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पुरेशा आणि सुस्थितीत असलेल्या वर्गखोल्या तसेच सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
मूलभूत सुविधा नसलेल्या शाळांवर तातडीने लक्ष
ज्या शाळांमध्ये पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही, अशा शाळांमध्ये तातडीने सुविधा निर्माण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायत निधीचा प्राधान्याने वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सुविधांची पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यू-डायस प्रणालीमध्ये नोंदवलेली माहिती आणि प्रत्यक्ष शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा यांची पडताळणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास ती तातडीने दुरुस्त करण्यास सांगण्यात आले.
गावकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर
शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामपंचायत, मुख्याध्यापक, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच शाळांच्या विकासकामांमध्ये गावकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.
दरम्यान, शाळांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App