विशेष प्रतिनिधी
मुंबई : अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळले आहेत. महाप्रसादाच्या माध्यमातून भाविकांना अन्नातून विषबाधा होऊ नये, तसेच अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता कायम राहावी यासाठी FDAकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. Tukaram Mundhe
तुकाराम मुंढे यांनी FDAच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अन्नभेसळीविरोधात राज्यभर कारवाईला वेग आला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धाडी आणि कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सुटे खाद्यतेल विकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा देत नागरिकांनी असे तेल खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
महाप्रसादासाठी नोंदणी अनिवार्य
आता महाप्रसाद आयोजित करणाऱ्या आयोजकांसाठी अधिकृत परवाना किंवा नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. विनापरवाना महाप्रसादाचे आयोजन केल्यास संबंधित आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास परिस्थितीनुसार गुन्हाही दाखल होऊ शकतो.
स्वच्छता आणि सुरक्षिततेवर भर
महाप्रसाद तयार करताना आणि वाटप करताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी सुरक्षित, आरओ पाण्याचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाप्रसाद तयार करणारे आणि वाटप करणारे स्वयंसेवक यांना मास्क, हातमोजे आणि डोक्यावर टोपी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
शिळे अन्न वाटल्यास कारवाई
भाविकांना शिळे किंवा खराब झालेले अन्न वाटप केल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्नाचा दर्जा आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी अन्नाची साठवणूक आणि वितरण योग्य पद्धतीने करणे आवश्यक असणार आहे.
महाप्रसादाचे अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी स्टेनलेस स्टील किंवा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित भांड्यांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अवघ्या १०० रुपयांत ऑनलाइन नोंदणी
आयोजकांना नोंदणी करताना अडचणी येऊ नयेत यासाठी FDAने प्रक्रिया सुलभ केली आहे. अवघ्या १०० रुपयांत ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक परवाना मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.
महाप्रसादाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने भाविकांना अन्न दिले जाते. त्यामुळे निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधा किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत, यासाठी FDAने हे नियम अधिक कठोर केले आहेत. आता या नियमांचे पालन न करणाऱ्या आयोजकांवर FDAकडून कारवाई होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App