विशेष प्रतिनिधी
परभणी : शिवसेना ठाकरे गटातून नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आता एका आलिशान ‘डिफेंडर’ गाडीमुळे चर्चेत आले आहेत. मतदारसंघात या गाडीच्या मालकीवरून चर्चा सुरू झाल्यानंतर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट स्पष्टीकरण दिले. “ही डिफेंडर माझी नसून माझ्या मित्राची आहे,” असे त्यांनी सांगितले.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘प्राईड मिशन’च्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचे होते. त्या वेळी ते मुंबईत होते. या कार्यक्रमाला राज्यपालांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याने प्रवासासाठी त्यांचे मित्र शाम गंभीरे यांनी त्यांना ही डिफेंडर गाडी दिली होती.
“मी मुंबईत होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईड मिशनचा कार्यक्रम होता. माझा मित्र शाम गंभीरे याने मला ही गाडी दिली. माझ्याकडे गाडी पाहिल्यानंतर लगेच ती माझीच असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ती माझी नसून माझ्या मित्राची आहे,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.
या चर्चेवरून त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला. “आम्ही काही केलं तर ते काही लोकांना पाहवत नाही,” असे ते मिश्कीलपणे म्हणाले.
डिफेंडर ही देशातील महागड्या एसयूव्हींपैकी एक आहे. २०२६ मधील उपलब्ध किमतीनुसार या गाडीची भारतातील एक्स-शोरूम किंमत सुमारे १.०३ कोटी रुपयांपासून २.६२ कोटी रुपयांपर्यंत जाते. विविध प्रकार आणि सुविधांनुसार किंमत बदलते. त्यामुळे जाधव या गाडीतून फिरताना दिसल्यानंतर तिच्या मालकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
जाधव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या नावावर इनोव्हा कार नमूद केली होती. तिची घोषित किंमत सुमारे २७.०६ लाख रुपये होती. त्या प्रतिज्ञापत्रातील वाहनांच्या यादीत डिफेंडरचा उल्लेख नव्हता.
जूनमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सहा लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामध्ये परभणीचे संजय जाधव यांचाही समावेश होता. पक्षबदलानंतर जाधव यांनी आपल्या निर्णयामागे मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळण्याचा मुद्दा असल्याचे म्हटले होते. लोक विकासकामांसाठी निधी मागतात, मात्र तो उपलब्ध करून देता येत नसल्याची भूमिका त्यांनी त्यावेळी मांडली होती.
आता पक्षबदलानंतर काही महिन्यांतच कोटींच्या घरातील डिफेंडरमधून जाधव दिसल्याने मतदारसंघात नव्या चर्चेला तोंड फुटले. मात्र गाडी स्वतःची नसून मित्र शाम गंभीरे यांची असल्याचे स्पष्ट करत जाधव यांनी मालकीबाबतच्या चर्चांना उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App