विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने विविध उपक्रमांचे नियोजन केले असून, यंदाचा गणेशोत्सव राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे जागतिक व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. Ganeshotsav
गणेशोत्सवाला मागील वर्षी ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आता या उत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवाचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय विभाग आणि महामंडळांना या मोहिमेत स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
४८० गणेश मंडळांना दीड कोटींची बक्षिसे
गणेशोत्सवाच्या काळात तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांपैकी ४८० मंडळांना एकूण दीड कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या माध्यमातून सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
देशभरात आणि परदेशातही सांस्कृतिक कार्यक्रम
गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील संस्कृती देशाच्या विविध भागांत आणि परदेशात पोहोचवण्याचे नियोजन आहे. यासाठी देशातील १० राज्यांमध्ये, भारताबाहेरील एका देशात, दिल्लीमध्ये पाच दिवस आणि मुंबईत आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
राज्यातील सर्व ३८ विभाग आणि महामंडळांना या मोहिमेत विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
भाविकांसाठी विशेष सुविधा
आरोग्य विभागाकडून गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग भाविकांसाठी सुलभ दर्शनाची व्यवस्था केली जाणार असून, रॅम्प, व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती आणि ‘स्पर्शदर्शन’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
ऊर्जा आणि पर्यावरण विभागाला गणेश मंडळांना सुलभ वीज जोडणी उपलब्ध करून देण्याबरोबरच सौरऊर्जेवरील मंडप आणि एलईडी रोषणाईला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्थानिक कारागिरांना मिळणार बाजारपेठ
उद्योग, सहकार आणि कृषी विभागाच्या माध्यमातून स्थानिक कारागीर, सूक्ष्म व लघु उद्योग आणि महिला बचतगटांना गणेशोत्सवाशी संबंधित व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. मोदक, प्रसाद, पूजा साहित्य आणि अन्य पारंपरिक वस्तूंच्या विक्रीसाठी विशेष संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आभासी दर्शनासाठी स्वतंत्र संकेतस्थळ
भाविकांना राज्यातील प्रसिद्ध गणपतींचे आभासी दर्शन घेता यावे, यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची योजना आहे. याशिवाय घरगुती गणेशमूर्तींची छायाचित्रे अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गणेश रील्स स्पर्धा, मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा यांसारखे उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमातूनही गणेशोत्सवाची परंपरा आणि पर्यावरणपूरक संदेश जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आशिष शेलारांचा जागतिक वारशाचा निर्धार
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक विभागाने केलेल्या प्रयत्नांनंतर आता सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी गणेशोत्सवालाही जागतिक वारसा पटलावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राज्य महोत्सवांतर्गत आयोजित स्पर्धांच्या समन्वयाची जबाबदारी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकादमीकडे देण्यात आली आहे. विविध उपक्रमांमध्ये समन्वय राखण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाचा गणेशोत्सव त्यामुळे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता महाराष्ट्राची परंपरा, कला, सामाजिक सहभाग आणि पर्यावरणपूरक संस्कृती जगासमोर मांडणारा व्यापक उपक्रम ठरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App