विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमधील सुंदाेपसुंदी सुरूच असून आता आमदार नीलेश राणे यांनी थेट भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांना इशारा दिला आहे. शिंदेसाहेबांवर बाेलताना लायकीत राहायचं, तुझी लायकी किती असा इशारा राणे यांनी दिला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर आता शिवसेनेचे नेते नीलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. नीलेश राणे यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नवनाथ बन यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती अन् तू बोलतो किती.” या पोस्टमुळे महायुतीमधील तणाव आता चव्हाट्यावर आला आहे.
नवनाथ बन यांच्या आरोपांना उत्तर देताना राणे म्हणाले, “नवनाथ बन म्हणजे संपूर्ण भाजप नाही, ते केवळ पक्षाचे एक प्रवक्ते आहेत. कोणतेही सबळ पुरावे नसताना त्यांनी शिवसेनेवर असे बिनबुडाचे आरोप करू नयेत. नवनाथ बन यांच्यात स्वतःहून एवढे मोठे बोलण्याची ताकद आहे का? त्यांच्या मागून कोणीतरी त्यांना हे सर्व बोलायला लावत आहे का, असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो.
राणे म्हणाले, “महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीतील पराभवाचे खापर एका मित्रपक्षावर फोडणे योग्य नाही. आपल्याला युती टिकवायची आहे, हे विसरून चालणार नाही. असे भांडण लावून किंवा एकमेकांवर आरोप करून युती टिकणार नाही.”
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल शिवसेनेला आदर असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. “आम्ही भाजपचा आणि त्यांच्या नेत्यांचा आदर करतो. भाजप हा आमचा मित्रपक्ष आणि सहयोगी पक्ष आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो. भाजपचे वरिष्ठ नेते स्वतःहून अशी विधाने करतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे एक-दोन लोकांनी यात मिठाचा खडा टाकून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,” असे आवाहन राणे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App