विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘२०१९ पर्यंत उद्धव ठाकरे यांनी जेव्हा जेव्हा मला फोन केला, तेव्हा तेव्हा मी गेलो. मात्र, २०१९ नंतर त्यांनी मला बोलावलेच नाही. अन्यथा मी नक्की गेलो असतो. मी तर त्यांची वाटच पाहत राहिलो,’ अशा मिश्कील शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच उपस्थितीत टोला लगावला. फडणवीस यांच्या या विधानामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा राजकीय टोलेबाजीचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह साहित्य, कला आणि व्यंगचित्र क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा इतिहास, नामवंत व्यंगचित्रकारांचे योगदान आणि त्यांच्या निवडक कलाकृतींचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
कार्यक्रमादरम्यान आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचा फोन आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहतात, असे विधान केले. त्याचा धागा पकडत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून २०१९ पूर्वीच्या राजकीय संबंधांची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यावर आपण नेहमी जात होतो; मात्र २०१९ नंतर त्यांनी बोलावलेच नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
‘आज तरी प्रतिटोला बसणार नाही!’
भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी व्यासपीठावरील आसनव्यवस्थेवरूनही विनोद केला. सर्वजण डाव्या बाजूला गेल्यामुळे आपण जाणीवपूर्वक उजव्या बाजूला बसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमात शेवटचे भाषण करण्याचा फायदा असा की, राज ठाकरे आता आपल्या वक्तव्याला उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आज काहीही बोललो तरी प्रतिटोला बसणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
फडणवीस यांच्या या वक्तव्याला राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून उत्तर दिले. आपण यापुढेही मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमासाठी बोलावत राहू आणि ते येत राहतील; मात्र त्यासाठी त्यांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवावे लागेल, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला. त्यांच्या या विधानानेही सभागृहात हशा पिकला.
राज ठाकरेंच्या व्यंगचित्रकलेचे कौतुक
फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेचे कौतुक करताना एक जुना किस्साही सांगितला. राज ठाकरे यांना आपले व्यंगचित्र काढण्याची विनंती करताना नाक आणि कान मोठे दाखवले तरी चालतील; मात्र पोट मोठे दाखवू नका, अशी अट आपण घातली होती. राज ठाकरे यांनी ती मान्य केली. मात्र, इतर व्यंगचित्रकारांना आपले पोटच अधिक दिसते, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
व्यंगचित्रांच्या सामर्थ्याविषयी बोलताना फडणवीस यांनी नेपोलियन आणि ब्रिटिश पंतप्रधानांशी संबंधित ऐतिहासिक व्यंगचित्राचा संदर्भ दिला. व्यंगचित्र हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर प्रभावी भाष्य करणारी कला आहे. एखादे व्यंगचित्र मोठ्या राजकीय सत्तेलाही अस्वस्थ करू शकते, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राने व्यंगचित्रकलेची समृद्ध परंपरा जपली असून या माध्यमातून समाजातील विरोधाचे स्वर आणि काळातील महत्त्वाच्या घडामोडी प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन
यावेळी फडणवीस यांनी मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन उभारण्याची घोषणाही केली. या उपक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार आहेत, तर उद्धव ठाकरे उत्तम छायाचित्रकार आहेत. आपण राजकारणात काम करत असल्याने त्यांनीही आपल्याला त्या क्षेत्रात काम करू द्यावे, अशी आणखी एक कोपरखळी त्यांनी मारली.
राजकीय मतभेद असले तरी सांस्कृतिक आणि कलाविषयक कार्यक्रमांत एकत्र येणे ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राजकीय विरोधकांशी संवाद साधणे किंवा त्यांच्यासोबत चहापान करणे यात काहीही गैर नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App