विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. सलग तेराव्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशवासियांना ‘लहान स्वप्नं सोडा, मोठी स्वप्नं पाहा आणि मोठे संकल्प करा’ असा संदेश दिला.
मोदी म्हणाले की, भारताने आता छोट्या ध्येयांमध्ये अडकून राहण्याची वेळ संपली आहे. मोठी स्वप्नं पाहिल्याने विचारांचे क्षितिज विस्तारते आणि संकल्प मोठे असतील तर प्रयत्नांची ताकदही वाढते. त्यामुळे 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याच्या जोरावर 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प देशाने करायला हवा.
‘2047 चं स्वप्न पूर्ण होणारच’
भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देश विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 140 कोटी भारतीय एकत्रितपणे एखादे मोठे लक्ष्य निश्चित करतात, तेव्हा ते देशाच्या सामर्थ्याचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरते, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या 12 वर्षांत देशातील नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत मोदींनी सांगितले की, गरीब, शेतकरी, मध्यमवर्ग, शहरी आणि ग्रामीण नागरिकांच्या योगदानामुळे भारताने विकासाची नवी गती पकडली आहे. त्यांच्या मते, या काळात 25 कोटी नागरिक दारिद्र्याच्या स्थितीतून बाहेर आले, तर भारत जगातील पहिल्या पाच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचला.
‘होईल, पाहू’च्या मानसिकतेतून भारत बाहेर आला
स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही. ‘होतंय, चालतंय, होईल’ या मानसिकतेत भारत बराच काळ अडकून राहिला, अशी टीका मोदींनी केली. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताने विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण उत्पादन, खादी-ग्रामोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रेल्वे कोच निर्मिती, मोबाइल उत्पादन, डिजिटल व्यवहार आणि पेटंटच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केल्याचा दावा मोदींनी केला.
सामान्यांच्या सुविधांनाही वेग
सरकारने मूलभूत सुविधांच्या विस्तारालाही वेग दिल्याचे मोदी म्हणाले. नळजोडणी, गॅस कनेक्शन, शौचालये आणि गरीबांसाठी घरांच्या निर्मितीचा वेग वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय प्रशासनातील जुनी व्यवस्था बदलण्यासाठी हजारो मंजुऱ्या कमी करण्यात आल्या आणि अनेक जुने कायदे रद्द करण्यात आल्याचे मोदींनी नमूद केले. आधुनिक पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या विस्तारावरही सरकारने भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारतावर मोदींचा जोर
भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. परदेशातून स्वस्त किंवा सहज उपलब्ध वस्तू आयात करण्याऐवजी भारताने स्वतःची उत्पादन क्षमता आणि कौशल्य वाढवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
“दुसऱ्या देशांवर अवलंबून राहून आपले सामर्थ्य वाढणार नाही. आपल्या क्षमतांची कसोटी लागली पाहिजे आणि आपल्या हिताचे संरक्षण आपण स्वतः केले पाहिजे,” असा संदेश देत मोदींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
पूर-भूस्खलनग्रस्तांना दिलासा
भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी देशातील काही भागांत झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या घटनांचा उल्लेख केला. या संकटग्रस्त नागरिकांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लाल किल्ल्यावरून प्रथमच ‘वंदे मातरम्’चे स्वर घुमल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App