विशेष प्रतिनिधी
पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून उद्योगविश्वात नाराजी वाढत आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वीज समस्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे चाकण एमआयडीसीतील तब्बल २० कंपन्यांनी खंडाळा एमआयडीसीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. Sharad Pawar
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला पायाभूत सुविधांबाबत सतर्क होण्याचा इशारा दिला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, तर त्याचा थेट परिणाम गुंतवणूक आणि रोजगारावर होऊ शकतो, असा मुद्दा या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चाकण एमआयडीसीतील उद्योजकांनी रस्ते, वाहतूक व्यवस्था, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपन्यांच्या स्थलांतरामुळे सुमारे दोन हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्रातील कंपन्या बाहेर जात नाहीत’ असा सरकारकडून करण्यात येणारा दावा आणि चाकणमधील उद्योजकांनी घेतलेला स्थलांतराचा निर्णय यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. उद्योजकांनी बैठका आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
चाकणसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना रोखण्यासाठी सरकार आता कोणती ठोस पावले उचलणार, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे राज्यासाठी भूषणावह नाही,” अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेला ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा वारसा कोणत्याही विचारांच्या सरकारने जपला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
चाकणमधील २० कंपन्यांचा प्रश्न आता केवळ काही खराब रस्त्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यात उद्योग टिकणार की अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे दुसऱ्या औद्योगिक पट्ट्यांकडे वळणार, याची ही मोठी परीक्षा ठरणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील उद्योगांची परिस्थिती तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहेत. तसेच उद्योजकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी बैठक बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.पुणे जिल्हा प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमणे हटवणे, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी विविध यंत्रणांना ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना करण्याचे लक्ष्य दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App