वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Nautapa देशभरात ‘नौतपा’ सुरू होताच उष्णतेची तीव्र लाट पसरली असून महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस भीषण उष्णतेचा आणि हीटवेव्हचा इशारा दिला असून अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.Nautapa
उत्तर भारतात उष्णतेची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे तापमान 47.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून ते देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पुढील दोन दिवसांत तापमान 49 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही तापमान 44 ते 45 अंशांच्या दरम्यान असून उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.Nautapa
महाराष्ट्रातील विदर्भ भागातही उन्हाचा प्रकोप तीव्र झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 47 अंशांच्या आसपास तापमान नोंदवण्यात आले. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि अमरावतीमध्येही पारा 45 अंशांच्या पुढे गेला आहे. IMDने चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोल्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
‘नौतपा’ हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर सुरू होणारा नऊ दिवसांचा कालावधी मानला जातो. पारंपरिक मान्यतेनुसार हा वर्षातील सर्वाधिक उष्ण काळ असतो. यंदा 25 मेपासून सुरू झालेल्या नौतपामुळे उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कमी वेगाचे वारे, कोरडे वातावरण आणि सतत प्रखर सूर्यप्रकाश यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे.
उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शहरांमध्ये दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले असून उष्माघात, निर्जलीकरण आणि थकव्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलके सूती कपडे वापरणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, 28 मेनंतर काही भागांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि काही दक्षिणेकडील राज्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App