विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे आणि 2022 पासून बिहारच्या राजकारणात सक्रिय असलेले प्रशांत किशोर (पीके) यांनी या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) खासदार मीसा भारती यांनी प्रशांत किशोर यांच्यावर गंभीर आरोप करत, “ते प्रत्यक्षात भाजपचेच खरे उमेदवार आहेत,” असा दावा केला. Prashant Kishor
माध्यमांशी संवाद साधताना मीसा भारती म्हणाल्या की, “बांकीपूरमध्ये भाजपचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला असला, तरी प्रशांत किशोर यांचा विजय म्हणजे भाजपचाच विजय आहे. भाजपने आपला उमेदवार बदलण्यामागचे कारण संशयास्पद आहे. स्वतःच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांनी दुसऱ्या मार्गाने विजय निश्चित करण्याचा प्रयत्न केला. यावरून भाजपला स्वतःच्या बळावर जिंकण्याचा आत्मविश्वास नव्हता, हे स्पष्ट होते.”
त्या पुढे म्हणाल्या, “प्रशांत किशोर हे प्रत्यक्षात भाजपचेच उमेदवार आहेत, हे सत्य जनतेसमोर हळूहळू येईल. निवडणुकीदरम्यान त्यांनी मतदारांना अनेक मोठी आश्वासने दिली असून, त्यांची पूर्तता करणे सोपे नाही.”
या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्यासह एकूण 25 उमेदवार रिंगणात होते. अंतिम निकालात त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा 18,953 मतांच्या फरकाने पराभव केला. प्रशांत किशोर यांना 63,203 मते मिळाली. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला बसलेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी, “बांकीपूरमधून भाजपने कुत्रा-मांजरालाही उमेदवारी दिली तरी तो जिंकून येईल,” असे वक्तव्य केले होते. मात्र निकालाने हा आत्मविश्वास फोल ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनीही याच वक्तव्याचा मुद्दा बनवत भाजप मतदारांना गृहीत धरत असल्याचा आरोप प्रत्येक सभेत केला होता. मतदारांपर्यंत हा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याने त्यांच्या प्रचाराची रणनीती यशस्वी ठरल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App