विशेष प्रतिनिधी
पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) वडकी येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचा ‘कॅरीइंग अँड फॉरवर्डिंग’ औषध विक्री परवाना २७ ऑगस्टपासून तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. गोळ्यांची पॅकेजिंग, साठवणूक, नोंदी ठेवणे आणि त्या बाजारातून परत मागवणे याबाबत गंभीर अनियमितता आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.Cipla Pharma
एफडीएच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील वडकीतील कंपनीच्या मुख्य गोदामाची तपासणी केल्यानंतर २७ ऑगस्टला हा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. कंपनीच्या औषध साठवणूक आणि वितरण प्रणालीमध्ये अनेक नियामक त्रुटी आढळल्या. औषधे थेट जमिनीवर ठेवलेली आढळली तसेच पॅलेट्स आणि रॅकची अपुरी व्यवस्था, प्रत्यक्ष साठा आणि संगणकीकृत नोंदींमधील तफावत आणि मुदत संपलेल्या औषधांच्या हाताळणीबाबतच्या प्रक्रियेतील व नोंदींमधील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘एफडीए’ने जून २०२६ मध्ये वडकी येथील ‘सिप्ला फार्मा’च्या मुख्य गोदामावर कारवाई केली होती. त्यावेळी ‘रिॲक्टिन प्लस टॅब्लेट’या शेड्युल एच औषधाच्या पॅकेजिंगवर अनालजेसिक व अँटीपायरेटीक असा परवानगी नसलेला मजकूर छापल्याचे उघडकीस आले होते. अशा जाहिरातीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविना परस्पर औषधे घेण्याची प्रवृत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘एफडीए’ने ११ लाख १९ हजार रुपयांचा साठा जप्त केला होता. तसेच, संबंधित औषधाचा साठा बाजारातून परत मागविण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले होते.
मात्र, कंपनीने या आदेशाचे योग्य पालन केले नाही. परिणामी एफडीएने औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियमअंतर्गत कंपनीचा परवाना रद्द केला असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, ‘औषधांची सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही शिथिलता दाखविली जाणार नाही. ‘शेड्युल एच’ औषधांची जाहिरात, विक्री आणि साठवणूक यामध्ये कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App