PM Narendra Modi Speech : सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास, देशसेवेची भावना आणि विकसित भारताचे स्वप्न यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. ‘देशासमोर सत्ता सुख काहीही मोठं नाही. पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी मिळणार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत देशसेवेप्रती आपली भूमिका स्पष्ट केली. 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा सार्वजनिक जीवनात 25 वर्षांचा टप्पा गाठू, अशी कल्पनाही केली नव्हती, असे मोदी यांनी सांगितले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासामुळे हा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दिल्लीत जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे भारतीयांचा विश्वास आणि त्यांनी दिलेल्या संधीमुळे पूर्ण करता आली. यासाठी त्यांनी भारताची लोकशाही आणि संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानपदाची अपेक्षा कधी केली नव्हती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘देशासमोर सत्ता सुख काहीही मोठं नाही’
पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा गोष्ट देशाची असते, तेव्हा पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांना काहीही महत्त्व नसते. देशासमोर सत्ता सुख काहीही मोठं नाही. पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी मिळणार नाही.”
गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाकडे लोक उपलब्धी म्हणून पाहत असले तरी, आपल्यासाठी हा व्यक्तिगत महिमामंडणाचा विषय नसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. तरुण वयात आदिवासी आणि समाजातील वंचित घटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आपला राजकीय प्रवास हा प्रामुख्याने संघटनात्मक स्वरूपाचा होता, असे त्यांनी सांगितले.
‘मी महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, मिशनसाठी जगणारा’
“माझं काय होईल, याचा विचार मी कधीच केला नाही. मी ॲम्बिशनसाठी नव्हे, तर मिशनसाठी जगणारा माणूस आहे. मला जी जबाबदारी मिळाली, ती मी निभावत गेलो. जीवनाचं एकच ध्येय होतं, देशाची निरंतर सेवा. कर्म हीच सेवा आहे. मी कर्माला माझं कर्तव्य मानतो,” असे मोदी म्हणाले.
काम कधीही थांबता कामा नये, कर्म हे देशासाठी साधना आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देश आणि देशवासीयांसाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी जनतेच्या चरणी नतमस्तक’
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचे श्रेय जनतेला दिले. “हे जनतेच्या आशीर्वादाचे फळ आहे. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांप्रति मी कृतज्ञ आहे. मी जनतेच्या चरणी नतमस्तक होतो,” असे ते म्हणाले.
या काळात जनतेने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी दिली. देशासाठी आणखी जोमाने काम करण्याची आणि जनतेची सेवा करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केल्याचेही मोदी यांनी सांगितले.
बुद्धापासून विवेकानंदांपर्यंतच्या विचारांचा उल्लेख
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज मी जे काही आहे, जिथे कुठे आहे आणि माझ्यावर जी काही जबाबदारी आहे, त्यात लोकांचेच सर्वात मोठे योगदान आहे. माझ्यासाठी लोकच देव आहेत. देशाने मला खूप काही दिले आहे, त्यामुळे देशाप्रती माझी जबाबदारी अफाट आहे.”
निवडणुकांनी आपल्याला शिकवले की संसाधने मर्यादित असली तरी धैर्य आणि स्वप्ने मोठी असली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. बुद्धापासून स्वामी विवेकानंदांपर्यंतच्या विचारधारेची जोपासना करणाऱ्या राष्ट्राची सेवा करताना कधीही एकटेपणा जाणवला नाही, असे मोदी म्हणाले.
स्वयंसेवकांकडून मिळालेल्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला. “आम्ही मानवतेचे सेवक आहोत. सेवा हा आमचा धर्म आहे. गरीब आणि गरजूंची सेवा करणे हे आमचे अविचल कर्तव्य आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब
पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या पुढील वाटचालीवरही भाष्य करत आत्मनिर्भर भारत, उत्पादन क्षेत्राचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा संकल्प अधोरेखित केला. देशाच्या विकासासाठी जनतेचा सहभाग, मोठी स्वप्ने आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पुढील काळात अधिक वेगाने काम करण्याची गरज असल्याचे सांगत, देशसेवा हीच आपल्या सार्वजनिक जीवनाची प्रेरणा असल्याचा संदेश मोदी यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App