तुझ्या ताेंडातला साेन्याचा चमचा शाेधताेय, मुलीच्या पत्रानंतर राेहित पवारांना वडलांचेही भावनिक पत्र

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील एमपीएससी आंदाेलनाचे नेतृत्व करत असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांच्या मुलीने मंगळवारी त्यांना पत्र पाठविले हाेते. आता त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही पत्र पाठवले असून साेन्याचा चमचा ताेंडात घेऊन आलेला या टिकेवर उत्तर दिले आहे.

राजेंद्र पवार यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, परवा #MPSC च्या चालू आंदोलनात तुझ्यासोबत रस्त्यावर झोपलो. तुझा संघर्ष व कमिटमेंट असूनही विरोधक सतत म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधू लागलो. १९५४ ला ११० रुपये पगारावर माझे वडील आप्पासाहेब पवार नोकरीला लागले. २५ वर्षे नोकरी, उरलेली २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम. महाराष्ट्राला क्रॉसब्रीड गाईंची ओळख करून देऊन आजची ग्रामीण अर्थव्यवस्था दुधामुळे बदलली, १९८० ला ड्रिपचा प्रसार करून प्रथम पाणी बचतीचा मार्ग दाखवला. शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी काम केले,केंद्रसरकारने पद्मश्री दिली. शेवटपर्यंत सामाजिक काम करत असतानाही राजकारणी भावासाठी राजकीय मदत “थँकलेस जॉब” असला तरी करत राहिले.

तुझा बाप १९७८ साली अवघे ५०० डॉलर घेऊन अमेरिकेला संघर्षातूनच शिक्षण घेण्यास गेला. तिथल्या झगमगाटीतील सोन्याचा चमचा न पाहता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत आला. शेती ही आनंद व संघर्षाचे मिश्रण आहे, हे करत एक नावाजलेली संस्था सामाजिक भावनेतून चालवत असतानाच मुरघास,कृषिक #Contract_Farming_in_Poultry व अनेक उपक्रमाची ओळख शेतकर्‍यांना करून देत आहे.

तुझे कॉलेज संपल्यानंतर तू एकटा नोकरी न करता हजारो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत तू राजकारणात येण्यापूर्वी आपण स्वत:ची इंडस्ट्री उभी केली. लहानपणी तुला भारी खेळणी नव्हती म्हणून तू गड्यांची पोरं घेऊन मासे, खेकडे पकडायला ओढ्याने जायचास. ते धरताना बिळ सापाचे का खेकड्याचे याचा विचार न करता त्यात हात घालायचास, तुझी हात घालण्याची ही धाडसी सवय त्यामुळेच तयार झाली असावी. पण तू आता राजकारणात आहेस, राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव, आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही! असा सल्लाही राजेंद्र पवार यांनी दिला आहे.

राजेंद्र पवार यांनी पुढे म्हटले आहे की, इतिहासात आणि आताही अनेक बापांना रडता आले नाही आणि काळजीही करता येत नाही.उभारणीच्या संघर्षात वेळ गेल्यामुळे लहानपणी खेळवताही आले नाही पण आता तुझ्या पाठीशी आहे. “लढ,संघर्ष अटळ आहे,ना तुझा बाप राजकारणात होता ना तुझ्या बापाचे मोठे राजकारण आहे!” त्यामुळे तुझा सोन्याचा चमचा तुला मिळणारही नाही पण स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर.
तुझा पाठीराखा बाप
राजेंद्र पवार

Rohit Pawar receives emotional note from father: ‘Searching for the golden spoon in your mouth’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात