विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सवानिमित्त ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना प्रमुख मार्गांवर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली.
या टोलमाफीचा लाभ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66), मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) तसेच कोकणाकडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित मार्गांवर मिळणार आहे. याशिवाय अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफी लागू राहणार आहे.
गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, तसेच टोल नाक्यांवरील गर्दी कमी व्हावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसनाही टोलमाफी देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि एसटी महामंडळ यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे.
टोलमाफीसाठी विशेष पास बंधनकारक
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी खासगी वाहनांवर ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा विशेष स्टिकर-पास लावणे आवश्यक असणार आहे. या पासवर वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. हा पास जवळच्या पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौकी किंवा आरटीओ कार्यालयातून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, परतीच्या प्रवासासाठीही हाच पास ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आणि उत्सवानंतर पुन्हा मुंबई, पुणे किंवा इतर शहरांकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App