नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी नवी दिल्लीत जाऊन शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली; पण त्याचवेळी पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकविण्याची अयशस्वी धडपड दिसली!! Shiv Sena
– शिवसेनेची दिल्लीत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला २० राज्यांमधले शिवसेनेचे अध्यक्ष उपस्थित होते. शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजली आहेत. इतर राज्यांमध्ये सुद्धा शिवसेना रुजली पाहिजे आणि वाढली पाहिजे, यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न वाढविले पाहिजेत अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी राज्यांच्या शिवसेनेच्या अध्यक्षांना केल्या. एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या अध्यक्षांच्या अडीअडचणी सुद्धा समजावून घेतल्या. त्यावर काही उपाययोजना सांगितल्या.
– श्रीकांत शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा
याच दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी निम्म्या महाराष्ट्राचा शिवसेना संघटनेचा दौरा केला. या दौऱ्यातून श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमधल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाठोपाठ श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्व सुद्धा शिवसेनेत प्रस्थापित केले. मात्र या प्रस्थापना विरोधात शिवसेनेतून एकही आवाज उठला नाही. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना सगळ्या शिवसैनिकांनी साथ दिल्याचे चित्र समोर आले.
पटेल, तटकरेंचे पंख कापायचा “डाव”
पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र मोठे राजकीय घमासान रंगलेले दिसले. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेताच पार्थ आणि जय पवार यांचे नेतृत्व राष्ट्रवादी वर लादायचा “डाव” खेळला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पंख कापायचा प्रयत्न केला. पण या दोघांचे पंख कापले गेले नाहीतच, उलट त्या दोघांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त बळकट झाले. यासाठी त्यांना भाजपची मदत झाली. पार्थ पवारांना फक्त विक्रम काकडेला विधान परिषदेची उमेदवारी मिळवून देण्यात यश आले, पण त्यात सुद्धा पवार कुटुंबीय आणि काकडे कुटुंबीय यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा वाटा मोठा राहिला.
– पवार कुटुंबाचे वर्चस्व टिकविण्यात अपयश
त्यापलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांना इच्छा असून किंवा नसून छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची उमेदवारी देता आली नाही. त्यांना प्रफुल्ल पटेल यांचे एकेकाळचे पीए आणि समर्थक राजेंद्र जैन यांनाच राज्यसभेची उमेदवारी देणे भाग पडले. त्याआधी अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आणणे भाग पडले. सुनेत्रा पवारांना आपल्या दोन्ही मुलांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्यात अपयश आले. त्यामध्ये अप्रत्यक्षपणे शरद पवारांचा वाटा असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सूचक पद्धतीने सांगितले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवारांना येऊन भेटले. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पटेल आणि तटकरे यांचे राजकीय महत्त्व टिकून राहू शकले, असा टोला शशिकांत शिंदे यांनी हाणला. तो टोला सुनेत्रा पवारांच्या नेतृत्व (अ)क्षमतेवर बसला.
– समांतर वाटचालीत शिंदे फारच पुढे
राजधानी नवी दिल्लीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची अशी समांतर राजकीय वाटचाल दिसून आली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा संघटनात्मक पातळीवर कितीतरी पुढे गेलेली दिसली. पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पवार कुटुंबीयांचे वर्चस्व टिकविण्याच्या आणि झुगारण्याच्या नादात स्वतःच्याच पायात पाय घालून पडली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App