विशेष प्रतिनिधी
सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय सातारकरांना आला. शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकाकी बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्ध महिलेला पाहताच शंभूराज देसाईंनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. गाडीतून खाली उतरून त्यांनी स्वतः त्या आजीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
शिवतेज हॉल येथे सातारा जिल्हा पोलिसांच्या गणेशोत्सव आयोजनाच्या बैठकीला संबोधित केल्यानंतर शंभूराज देसाई आपल्या निवासस्थानी परतत होते. यावेळी शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकट्या बसलेल्या वृद्ध महिलेवर त्यांची नजर गेली. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहनताफा थांबवला.
‘आजी, तुम्ही कुठून आला?’
गाडीतून खाली उतरत शंभूराज देसाई थेट वृद्ध महिलेच्या जवळ गेले. त्यांनी अत्यंत आपुलकीने, ‘आजी, तुम्ही कुठून आला? तुमचे गाव कोणते? तुम्हाला कुठे सोडायचे आहे का?’ अशी विचारपूस केली.
इतकेच नाही तर ‘तुम्हाला काही खायचे आहे का?’ अशीही त्यांनी विचारणा केली. अचानक आजूबाजूला झालेल्या हालचालीमुळे काहीशा बावरलेल्या आजींनी आपण शाहूनगरला जात असल्याचे सांगितले. तसेच अंबाबाईचे देऊळ आणि आपला मुलगा डॉक्टर असून तो दवाखान्यात कामाला असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांना दिले तातडीचे निर्देश
वृद्ध महिलेची अवस्था लक्षात आल्यानंतर देसाई यांनी तातडीने पोलिस यंत्रणेला सक्रिय केले. या आजीच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
कुटुंबीयांचा शोध लागला नाही, तर त्यांची शासकीय वृद्धाश्रमात तातडीने व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.
‘पोलिसांचा मोठा गराडा नको’
दरम्यान, दोन महिला पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, वृद्ध महिलेभोवती पोलिसांचा मोठा गराडा होऊ नये, अशी सूचनाही शंभूराज देसाई यांनी केली.
वृद्ध महिलेशी संवेदनशीलतेने आणि आपुलकीने वागण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
या प्रसंगातून शंभूराज देसाई यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी सातारकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App