जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर बारसकरांचा सवाल; ‘नेमकं काय साध्य होणार?’

Ajay Barskar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने आंदोलनाची तयारी करत असतानाच त्यांच्यावरील टीका तीव्र झाली आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारसकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची पद्धत, मागण्यांमधील स्पष्टता, मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचा बदललेला मार्ग आणि आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली.

बारसकर यांनी जरांगे यांच्यासाठी ‘चालबाज’, ‘बंडलबाज’ आणि ‘भंपक’ असे शब्द वापरत त्यांच्या आंदोलनाच्या शैलीवर निशाणा साधला. “कधी जोश, कधी हसवणं, कधी रडवणं,” अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनातील कथित नाट्यमयतेवर टीका केली.

‘आधी एका हाकेवर गर्दी यायची’

जरांगे यांच्या पत्रकार परिषदांमधून समर्थकांना आंदोलनात सहभागी होण्याचे वारंवार आवाहन केले जात असल्याचा संदर्भ देत बारसकर यांनी त्यांच्या आंदोलनाच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पूर्वी जरांगे यांच्या एका हाकेवर मोठ्या संख्येने लोक एकत्र येत होते; मात्र आता आंदोलनासाठी वारंवार आवाहन करावे लागत असल्याचा दावा बारसकर यांनी केला. जरांगे यांच्या भूमिकेतील विसंगती लोकांच्या लक्षात येत असल्याने त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी झाला असल्याचेही त्यांनी म्हटले.

आंदोलनाचा मार्ग बदलल्यावरून सवाल

मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलनाच्या मार्गात करण्यात आलेल्या बदलावरूनही बारसकर यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. पूर्वीच्या मार्गावर अपेक्षित गर्दी होणार नसल्याची माहिती मिळाल्यामुळेच यंदा मार्ग बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

“आधी ज्या मार्गाने गेले, त्या मार्गावर आता लोक येणार नाहीत, हे त्यांना कळले आहे. म्हणून मार्ग बदलला,” असे बारसकर म्हणाले.

यापूर्वीही जरांगे मुंबईच्या दिशेने आंदोलन घेऊन गेले होते. त्या आंदोलनांतून नेमके काय साध्य झाले, असा सवाल करत बारसकर यांनी, “तीन वेळा मुंबईकडे गेलो, काय मिळालं?” असा प्रश्न उपस्थित केला.

‘मागण्या कागदावर लिहून द्या’

जरांगे मुंबईत नेमक्या कोणत्या मागणीसाठी जात आहेत आणि कोणती मागणी पूर्ण झाल्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल, याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप बारसकर यांनी केला.

“जरांगे पाटील यांना नेमकं काय पाहिजे ते कागदावर लिहून द्यावं. मी मध्यस्थी करतो,” असे आव्हानच त्यांनी दिले.

जरांगे यांच्या काही मागण्या कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत पूर्ण होणे शक्य नसल्याचा दावाही बारसकर यांनी केला. “ब्रह्मदेव जरी खाली आला तरी मनोज जरांगे जे मागत आहेत ते मिळणार नाही,” असे ते म्हणाले. सरकारने प्रत्येक मागणीवर स्पष्ट होकार किंवा नकार द्यावा; मात्र अशक्य मागण्यांभोवती समाजाला फिरवत ठेवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.



‘भावनिक वातावरणाने प्रश्न सुटणार नाही’

जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचे नुकसान होत असल्याचाही आरोप बारसकर यांनी केला. मराठा समाजातील काही घटक जरांगे यांच्या पाठीशी असले तरी संपूर्ण समाज त्यांच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत नाही, असा दावा त्यांनी केला.

पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रासह उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. केवळ संताप आणि भावनिक वातावरण निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे बारसकर यांनी म्हटले.

आर्थिक व्यवहारांवरही प्रश्न

बारसकर यांनी जरांगे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या वाहनांचा खर्च कोण करतो, उपचारांचा खर्च कुठून केला जातो आणि आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी कुठून येतो, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारमधील काही घटकांनी सुरुवातीपासूनच जरांगे यांना मोठे केले, असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी तसेच विरोधी आघाडीतील काही नेत्यांनी वेगवेगळ्या काळात आंदोलनाला मदत केल्याचा दावा बारसकर यांनी केला.

दरम्यान, “गर्दी झाली तर मुंबईच्या दिशेने पुढे जायचे, अपेक्षित गर्दी झाली नाही तर रुग्णालयात दाखल व्हायचे,” अशी रणनीती असल्याचा आरोपही बारसकर यांनी केला. त्यांच्या या सर्व वक्तव्यांवर जरांगे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Baraskar tears into Jarange, calls him ‘scheming, bluffing and bogus’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात