कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाला वेग द्या; निवारा केंद्रांची कामे वेळेत पूर्ण करा – आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : कोकणातील आपत्तीच्या काळात नागरिकांचे संरक्षण आणि सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी बहुउद्देशीय निवारा केंद्रांची कामे गतीने पूर्ण करावीत. ही केंद्रे गावांच्या जवळ किंवा शाळांच्या परिसरात उभारून, आपत्तीच्या काळाबरोबरच दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त ठरतील, अशा पद्धतीने त्यांची रचना करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यात कोकण आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली.

निवारा केंद्रांसाठी जागा निश्चित करताना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तेथे सहज आणि तातडीने पोहोचता येईल, याला प्राधान्य द्यावे. तसेच भूसंपादन आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया संबंधित विभागांनी समन्वयाने पूर्ण कराव्यात, असे तटकरे यांनी सांगितले.



रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १०३.५ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवावी, असे निर्देश देण्यात आले.

शासकीय जागेवर प्रस्तावित ३४ बहुउद्देशीय निवारा केंद्रांपैकी २४ केंद्रांसाठी जागा ताब्यात देण्यात आली असून, या सर्व ठिकाणी बांधकाम सुरू आहे. उर्वरित १० ठिकाणी भूसंपादन, सीआरझेड परवानगी आणि जागा मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. खासगी जागेवर प्रस्तावित २८ निवारा केंद्रांपैकी २४ केंद्रांची कामे सुरू झाली आहेत.

दरम्यान, समुद्रधूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या प्रस्तावित १४ कामांपैकी कोलाड, अलिबाग, सासवणे, थळ, वागदंडा, कोर्लई, बोर्ली आणि वेळास आगर येथील सात कामे प्रगतिपथावर आहेत. मान्सूननंतर या कामांना वेग देऊन फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत ती पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

खारभूमी विभागामार्फत प्रस्तावित १४ खारबंधाऱ्यांच्या मजबुतीकरणासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी सात कामे पूर्ण झाली असून, उर्वरित सात कामे सुरू आहेत. मान्सूननंतर ही कामे नियोजित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Accelerate the Konkan Disaster Mitigation Project; complete shelter center works on time – Aditi Tatkare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात