भरसभेत जिल्हा परिषद सदस्याला झापले, तटकरेंच्या अपमानावर रामदास कदमांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘निवडणुकीत कोणाला आपटायचे हे आम्हाला ठाऊक!’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये सातत्याने धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळते. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्षाला नवे कारण मिळाले आहे. तटकरे यांचे मेहुणे आणि जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांचा रामदास कदम यांनी भरसभेत अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर बिरवटकर यांनी फेसबुक पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

खेड तालुक्यातील पोयनार लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात हा प्रकार घडला. तब्बल २५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला २६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन पार पडले.



यावेळी बोलताना रामदास कदम यांनी मुलगा योगेश कदम याचे भरभरून कौतुक केले. राज्य सरकारवर कर्जाचा मोठा डोंगर असतानाही लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी जमवाजमव करावी लागत आहे. अशा परिस्थितीत योगेश कदम यांनी दोन धरणांसाठी ४०० कोटी रुपयांहून अधिक निधी सरकारच्या तिजोरीतून आणला. याचा बाप म्हणून मला अभिमान वाटतो, असे रामदास कदम म्हणाले.

मात्र, या कार्यक्रमात रामदास कदम आणि अजय बिरवटकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. भाषण सुरू असताना बिरवटकर यांच्याशी झालेल्या वादानंतर कदम यांनी त्यांना उद्देशून, ‘बसायचं तर बस, नाहीतर जा,’ अशा शब्दांत सुनावले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकारानंतर अजय बिरवटकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. ‘उतरती कळा लागली की माणसाची अशीच आगपाखड सुरू होते,’ अशा शब्दांत त्यांनी रामदास कदम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दरम्यान, सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय मतभेद याआधीही अनेकदा समोर आले आहेत. आता तटकरे यांच्या मेहुण्याला भरसभेत सुनावल्याने या वादाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील दोन घटक पक्षांतील हा संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Ramdas Kadam’s clarification regarding the insult to Tatkare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात