पुणे होणार देशाचे मोबिलिटी हब! मेट्रो, रिंगरोड, बोगदे अन् विमानतळ; फडणवीसांनी सांगितला विकासाचा आराखडा

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भर पडली असून, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते पार पडले. या विस्तारामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रासह शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून, शहराच्या जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्कही मजबूत होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

देशातील मेट्रोचे जाळे १२०० किलोमीटरवर

पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, नवोपक्रम आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. मेट्रोच्या वाढत्या सुविधांमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. २०१४ मध्ये देशात केवळ २४८ किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, देशातील २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. भारतीय मेट्रो नेटवर्कचा जगातील पहिल्या तीन मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मेट्रो सुविधांचा विस्तारही वेगाने होत आहे. २०१४ मध्ये राज्यात केवळ १० ते ११ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होता. आता सुमारे २०० किलोमीटर मार्ग प्रवाशांच्या सेवेत असून, ६८० किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत. राज्यात मेट्रो पायाभूत सुविधांवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो, शहरांची उत्पादकता वाढते आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते, असे प्रधानमंत्री म्हणाले.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर उभारण्यात आला आहे. सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. शहरांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



शहरी विकासासाठी एक लाख कोटींचा निधी

देशातील शहरांना विकासाची केंद्रे बनविण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल. गेल्या १० ते १२ वर्षांत ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यास यश आल्याचा उल्लेखही त्यांनी जागतिक बँकेच्या अहवालाच्या संदर्भाने केला.

पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइन यांमधील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशीलतेने उभे असल्याची ग्वाहीही प्रधानमंत्री मोदी यांनी दिली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, संकटाच्या काळात सरकार त्यांना मदत करेल, असे ते म्हणाले. दिवाळीच्या सणात दुष्काळग्रस्त आणि संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांचाही विचार करून त्यांच्या घरातही आनंद निर्माण होण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

२०३० पर्यंत पुणे देशाचे महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल : फडणवीस

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशात (पीएमआर) मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर रिंगरोड, आउटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून २०३० पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हिंजवडी आणि परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. येथे दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे अनेकांना एक ते दोन तास अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१८ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता त्यांच्याच हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पीपीपी मॉडेलवरील पहिला मेट्रो प्रकल्प

देशात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या धोरणानंतर शिवाजीनगर-हिंजवडी हा पहिला प्रकल्प ठरला. डीबीओटी तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र आणि राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी तसेच महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला.

या प्रकल्पाच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

पुणे शहरात सुमारे १२० किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून, काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील १२ महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा तिचे काम सुरू आहे. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार आणि त्याभोवतीची आर्थिक परिसंस्था विकसित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे महानगर प्रदेशासाठी पाच हजार कोटींचा निधी

पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून पुणे आणि पीएमआर परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.

पुणे मेट्रो ‘ग्रीन मेट्रो’ म्हणून विकसित होत असून, आवश्यक ऊर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. पुणे परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर आणि आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. यामुळे पुणे केवळ आयटी आणि उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच गरिबी निर्मूलन आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम मिळत राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

Pune will become an important mobility hub of the country, Chief Minister Fadnavis believes.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात