विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देत असतानाच बहुजन समाज पक्षाच्या नेतृत्वात मोठ्या बदलाचे संकेत मिळाले आहेत. बसपा प्रमुख मायावती यांनी आपले भाचे आकाश आनंद आणि ईशान आनंद यांना पक्षातील कोणतेही लहान-मोठे राजकीय पद देणार नसल्याचा ‘अंतिम निर्णय’ जाहीर केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांची बहीण दीपिका आनंद हिच्यासाठी भविष्यात पक्षात काम करण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. त्यामुळे बसपाच्या पुढील पिढीतील संभाव्य नवा चेहरा म्हणून दीपिका आनंद यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. Mayawati
मायावती यांनी सोशल मीडियावरील विस्तृत निवेदनात कुटुंबीयांना पक्षातील पदांचा आपोआप लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांचे धाकटे बंधू आनंद कुमार दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहून पक्षाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असले, तरी त्यांच्या दोन्ही मुलांना या नात्याचा राजकीय फायदा मिळू नये, अशी भूमिका मायावतींनी घेतली आहे.त्यामुळे आकाश आणि ईशान आनंद यांना भविष्यातही पक्षाच्या पदावर नियुक्त केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच निवेदनातील सर्वाधिक लक्षवेधी भाग म्हणजे दीपिका आनंद यांचा उल्लेख. दीपिका सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहेत. भविष्यात आनंद कुमार यांना पक्षाची कामे सांभाळण्यासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत आवश्यक वाटल्यास ते दीपिकाची मदत घेऊ शकतात, असे मायावतींनी म्हटले आहे. त्यानंतर तिची प्रामाणिकता, पक्षनिष्ठा आणि कार्यक्षमता पाहून आवश्यकतेनुसार पक्षात जबाबदारी देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे मायावतींनी थेट उत्तराधिकारी घोषित केलेला नसला तरी आकाश आणि ईशान यांना पूर्णपणे बाजूला करत दीपिकासाठीच राजकीय पर्याय खुला ठेवल्याने BSP मधील पुढील पिढीच्या नेतृत्वाचे समीकरण बदलले आहे.
बसपातील उत्तराधिकाराचा प्रश्न गेल्या काही दिवसांत वेगाने बदलला आहे. आकाश आनंद यांना पक्षातील प्रमुख जबाबदाऱ्यांमधून पुन्हा बाजूला करण्यात आले. त्यानंतर काही काळ त्यांचे धाकटे बंधू ईशान आनंद यांना पुढे आणले जात असल्याची चर्चा होती. मात्र आता मायावतींनी दोन्ही भावांना कोणतेही राजकीय पद देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने संपूर्ण समीकरणच बदलले आहे. या पार्श्वभूमीवर दीपिका आनंद यांचा स्पष्ट उल्लेख हा केवळ कौटुंबिक संदर्भ म्हणून न पाहता BSP च्या भविष्यातील नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
मायावतींची रणनीती केवळ कुटुंबातील बदलापुरती मर्यादित नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटना आणि उमेदवारीत युवकांना, विशेषतः Gen-Z ला, सुमारे 50 टक्क्यांपर्यंत प्रतिनिधित्व देण्याचा संकेत दिला आहे.
त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणारी आणि आतापर्यंत सक्रिय पक्षीय राजकारणापासून मोठ्या प्रमाणावर दूर राहिलेली दीपिका ही मायावतींच्या नव्या युवा रणनीतीमध्ये बसणारा चेहरा ठरू शकते. मात्र तिच्या हातात नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार, ती प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करणार का आणि निवडणूक राजकारणात उतरवली जाणार का, याबाबत मायावतींनी कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.
मायावतींनी आपल्या निर्णयामागे बसपाच्या चळवळीचे हित आणि परिवारवादापासून पक्षाला दूर ठेवण्याची भूमिका मांडली आहे. आनंद कुमार यांनी भविष्यात आपली जबाबदारी मुलांकडे किंवा त्यांच्या पुढील पिढीकडे देऊ नये, असेही त्यांनी म्हटले. दीपिका इच्छुक किंवा योग्य नसेल तर पक्षातील एखाद्या प्रामाणिक दलित कार्यकर्त्याला सर्वसंमतीने जबाबदारी देता येईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.पण आकाश आणि ईशान यांच्यासाठी राजकीय मार्ग बंद झाल्यानंतर BSP च्या पुढील पिढीतील सर्वाधिक चर्चेत आलेले नाव आता दीपिका आनंद हेच आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App