विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या जमीन व्यवहाराच्या आरोपांवर राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांच्या आरोपांमध्ये काडीमात्रही तथ्य नसून, शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयावर नाराज असल्यामुळेच सूडबुद्धीने असे खोटे आरोप केले जात असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून त्यांना या आरोपांचा कायदेशीर जाब विचारला जाईल, असा थेट इशाराही राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.Rahul Narwekar
ती जमीन ‘वर्ग-1’ प्रकारातील; आदिवासी बांधवांच्या तक्रारीत आमचे नाव नाही: राहुल नार्वेकर
प्रकरणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, 2024 मध्ये संबंधित जमिनीचे तत्कालीन मालक आणि काही स्थानिक आदिवासी यांच्यात वाद होऊन हे प्रकरण मानवी हक्क आयोगाकडे गेले होते. त्यावर तहसीलदारांमार्फत झालेल्या चौकशी अहवालात संबंधित आदिवासी बांधवांनी जमिनीचा मोबदला आणि पर्यायी पक्की घरे मिळाल्याचा जबाब दिल्याचे नमूद आहे. ही मूळ तक्रार माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात नसून आम्ही जमीन खरेदी करण्यापूर्वीच हे वाद मिटले होते, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले. संबंधित जमीन ‘वर्ग-1’ प्रकारातील आहे; ती जर आदिवासी बांधवांची असती तर कायद्यानुसार माझ्या कुटुंबीयांच्या नावावर झालीच नसती, असे सांगत काही लोकांना कायद्याची माहिती नसताना केवळ सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलण्याची सवय लागली असल्याचा टोला त्यांनी लगावला.Rahul Narwekar
‘अलिबाग आणि भांडुपमध्ये जागा बळकावण्याचा प्रयत्न करणारेच आज आरोप करत आहेत’
संजय राऊत यांच्यावर पलटवार करताना राहुल नार्वेकर म्हणाले की, ज्यांनी अलिबागमध्ये आजूबाजूच्या लोकांना धमकावून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्याविरोधात तक्रारी व गुन्हे दाखल होऊन चौकशी सुरू आहे आणि ज्यांनी भांडुपमधील बंगल्याबाहेरील जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, अशी व्यक्ती आज माझ्यावर आरोप करत आहे. केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरून जबरदस्तीने तक्रारी करायला लावल्या जात असल्याचे खुद्द तक्रारदारच सांगत असल्याचा दावा नार्वेकरांनी केला. यापुढे राऊतांना बिनबुडाचे आरोप करणे महागात पडणार असून कायदेशीर कारवाईतून त्यांना याचा हिशोब द्यावाच लागेल, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठणकावून सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App