अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलिसांचाही नकार बारामतीच्या नितीन यादव यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या शेवटच्या प्रवासासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी माहिती अधिकारातून प्रयत्न करणाऱ्या बारामती तालुक्यातील नितीन यादव यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांकडून माहिती मिळविण्यात अपयश आले आहे. मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नागरी विमान सुरक्षा ब्युरोने प्रथम अपिलात नकार दिल्याचे यादव यांनी सांगितले. तर देवगिरी निवासस्थान ते मुंबई विमानतळ या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाने नकार दिला आहे.

दिवंगत नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर अपघाताच्या दिवशी मुंबई विमानतळावरील तसेच त्यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानापासून विमानतळापर्यंतच्या प्रवासमार्गावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध व्हावे, अशी मागणी यादव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केली होती. मुंबई विमानतळावरील पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी त्यांनी नागरी विमान सुरक्षा ब्युरोकडे केली होती. मात्र, संबंधित विभागाने माहिती देण्यास नकार दिल्यानंतर यादव यांनी प्रथम अपील दाखल केले. हे अपीलही फेटाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादव यांच्या म्हणण्यानुसार, प्रथम अपिलावरील उत्तरात संबंधित सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांना देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच हे फुटेज पोलिसांना देण्यात आल्याचेही कळविण्यात आले. त्यामुळे विमानतळावरील संबंधित सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वात असून ते तपास यंत्रणांना देण्यात आल्याचे विभागाच्या उत्तरातून स्पष्ट होत असल्याचा दावा यादव यांनी केला आहे. मात्र, हे फुटेज सार्वजनिक करण्यास नकार देण्यात आला आहे.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दरम्यान, अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रवासमार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, यासाठी यादव यांनी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. २८ जानेवारी रोजी पहाटे सहा ते सकाळी आठ या वेळेतील प्रवासमार्गावरील वाहतूक पोलीस विभाग तसेच मुंबई पोलिसांच्या अखत्यारीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देण्याची मागणी त्यांनी केली होती. या अर्जावर मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाने ६ मार्च २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात माहिती अधिकार अधिनियमातील कलम ८ (१) (ज) चा आधार घेत माहिती देण्यास नकार दिला. मागितलेली माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हितसंबंधाशी संबंधित नसून, ती वैयक्तिक माहितीच्या स्वरूपातील असल्याने संबंधित व्यक्तीच्या खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर २० मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून हे उत्तर यादव यांना पाठविण्यात आले होते. या निर्णयाविरोधात ३० दिवसांच्या आत प्रथम अपील करण्याची तरतूदही पत्रात नमूद करण्यात आली आहे होती.

घातपात नसेल तर सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा….

दरम्यान, अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वाच्या घटनात्मक पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित सीसीटीव्ही फुटेजबाबत पारदर्शकता ठेवून जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात, अशी मागणी यादव यांनी केली आहे. अपघाताबाबत कोणताही घातपात नसल्यास केंद्र व राज्य सरकारने उपलब्ध असलेले संबंधित सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे विमानतळावरील फुटेज पोलिसांना दिल्याचे उत्तर मिळत असल्याचा दावा आणि दुसरीकडे प्रवासमार्गावरील फुटेज देण्यास मुंबई पोलिसांचा नकार, यामुळे या माहितीच्या उपलब्धतेबाबत आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अजितदादांच्या अपघाताबाबत जनतेच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Mumbai Police also refuse to provide CCTV footage of Ajitdada’s final journey Claim by Nitin Yadav from Baramati

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात