सुनील तटकरेंचा रामदास कदमांना पलटवार:म्हणाले, मानसिक स्थिती ठीक नाही, ठाण्याऐवजी आग्र्यात उपचार करा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: अजित पवार यांच्या अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणात सुनील तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी रामदास कदम यांनी केली होती. तसेच माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मृत्यूबाबतही कदम यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आता सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत कदम यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे, तर रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रामदास कदम यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे सांगत तटकरे यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. कदम यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याची टीका करत, त्यांच्यावर ठाण्यात उपचार करण्याऐवजी आग्र्याला उपचार करावेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

रामदास कदमांचे आरोप खोटे; तटकरे कायदेशीर नोटीस पाठवणार

अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणात सुनील तटकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मृत्यूचाही उल्लेख केला होता. तटकरे यांच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तींना संपवण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही कदम यांनी केला होता.

या आरोपांना उत्तर देताना तटकरे म्हणाले की, रामदास कदम यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. कोणताही आधार नसताना अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. या आरोपांचा आपण तीव्र निषेध करतो. कदम यांनी केलेल्या वक्तव्यांची गंभीर दखल घेत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

अंतुले यांच्याबाबत बोलण्याचा कदमांना अधिकार नाही

रामदास कदम यांनी ए. आर. अंतुले यांच्याशी संबंधित केलेल्या आरोपांवरही तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. आपण अंतुले यांचे पीए नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अंतुले यांच्याबाबत धर्मांध पद्धतीने आरोप केले जात असल्याची टीका करत, अशा विषयावर बोलण्याचा अधिकार रामदास कदम यांना नसल्याचे तटकरे म्हणाले.

कदम यांनी आपल्यावर आरोप करण्याऐवजी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्यावर यापूर्वी केलेल्या आरोपांना उत्तर द्यावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा कदम यांनी करावा. स्वतःची प्रतिमा नेमकी काय आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असा पलटवार तटकरे यांनी केला.



विरोधी पक्षनेतेपदासाठी रामदास कदम माझ्याकडे आले होते

यावेळी सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्यासोबतच्या जुन्या राजकीय संबंधांचाही दाखला दिला. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरची एक जुनी घटना सांगताना तटकरे म्हणाले की, त्या काळात रामदास कदम आपल्याकडे आले होते. विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी त्यांनी आपल्याला विनंती केली होती. त्यावेळी कदम यांनी आपल्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर आपण त्यांना आपल्या गाडीतून अजित पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. पुढे कदम यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले, असा दावा तटकरे यांनी केला.

आपण सांगत असलेली घटना खरी की खोटी, हे रामदास कदम यांनी ज्या जागृत देवस्थानावर श्रद्धा आहे, त्या ठिकाणी जाऊन स्पष्ट करावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले. कदम यांच्याकडून होत असलेली वक्तव्ये ही त्यांच्या ढासळलेल्या प्रकृतीचे द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली.

आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले

अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आधीच राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यात रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता तटकरे यांनी आरोप फेटाळण्यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच कदम यांच्या जुन्या राजकीय भूमिकांचा उल्लेख करत त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील हा वाद आगामी काळात आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Sunil Tatkare Hits Back at Ramdas Kadam Over Ajit Pawar Accident Allegations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात