विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद का नाकारले, याचे गूढ तब्बल 22 वर्षांनंतर स्वतः सोनिया गांधी यांनी उलगडून सांगितले आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आपल्या आत्मचरित्राच्या निमित्ताने ‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या माजी मुख्य संपादकांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक आणि भावनिक खुलासे केले आहेत. Sonia Gandhi
“लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच माझ्या मुलाने विचारले होते की काँग्रेस जिंकली तर तुम्ही पंतप्रधानपद स्वीकाराल का? तेव्हा मी स्पष्टपणे ‘अजिबात नाही’ असे उत्तर दिले होते. आपल्या आजी (इंदिरा गांधी) आणि वडिलांच्या (राजीव गांधी) हत्येच्या घटनांमुळे राहुल आणि प्रियांका अत्यंत भयभीत झाले होते; पंतप्रधानपद अत्यंत धोकादायक आहे असे त्यांना वाटत होते आणि मी पंतप्रधान बनू नये, अशीच त्यांचीही ठाम इच्छा होती,” असा खुलासा सोनिया गांधी यांनी केला आहे.
या सविस्तर मुलाखतीत सोनिया गांधी यांनी राजीव गांधींसोबतची त्यांची प्रेमकथा, 1975 ची आणीबाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी, गेल्या 12 वर्षांत लोकशाही संस्थांचे झालेले नुकसान आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली परखड मते मांडली आहेत.
मनमोहन सिंग सरकार चालवत होते, मी पक्ष;
2004 मधील राजकीय नाट्यावर आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवडीवर भाष्य करताना सोनिया गांधी म्हणाल्या, निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय पक्का झाला होता. नंतर पक्षाच्या नेत्यांनी आग्रह धरल्यामुळे जे ‘अवास्तव नाटक’ घडले, त्यावेळी मी काही क्षण ‘ठीक आहे’ म्हटले खरे, पण अखेरीस माझा मूळ निर्णयच कायम ठेवला आणि डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.
एका संघाप्रमाणे काम केले
“जर मी पंतप्रधान असते तर धोरणे वेगळी असती का, हा प्रश्न माझ्या मनात कधीच आला नाही. डॉ. मनमोहन सिंग सरकारचे नेतृत्व करत होते आणि मी पक्षाचे नेतृत्व करत होते; आम्ही एका संघाप्रमाणे अत्यंत सकारात्मकरीत्या काम केले.”
राजकीय तडजोडींचे अंतरात्म्यावर ओझे
“राजकारणात अनेकदा वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षांशी हातमिळवणी करण्याच्या कठीण तडजोडी कराव्या लागल्या. त्या पक्षाला फायदेशीर ठरल्या असल्या तरी माझ्या अंतरात्म्यावर आजही त्यांचे ओझे आहे. मात्र, आम्ही कधीही भाजप आणि आरएसएससोबत तडजोड केलेली नाही आणि भविष्यातही कधी करणार नाही.”
गेल्या 12 वर्षांत लोकशाही संस्थांचे मोठे नुकसान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर सोनिया गांधी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “सध्याचे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांना समान संधी मिळालेली नाही. निवडणूक आयोगासह सर्व घटनात्मक संस्थांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे, मुख्य प्रवाहातील माध्यमांवर वर्चस्व आहे आणि धर्माचा राजकीय वापर केला जात आहे.”
2029 मध्ये बदलाची आशा
“गेल्या 12 वर्षांत देशाच्या सामाजिक जडणघडणीचे आणि लोकशाहीचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार सत्तेतून गेल्यानंतरही व्यवस्था पुन्हा निरोगी स्थितीत आणायला वेळ लागेल. पण आता जनता अस्वस्थ होऊ लागली आहे आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा सुशासनाचे स्वागत होईल, असा मला विश्वास आहे.”
मोदी आणि आरएसएसवर भाष्य: नरेंद्र मोदी वंचित पार्श्वभूमीतून पुढे आले असले तरी त्यांची वैचारिक दुनिया पूर्णपणे वेगळी आहे. काँग्रेसमध्ये डॉ. मनमोहन सिंग आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची उदाहरणे आहेत; त्यामुळे आम्हाला आरएसएसकडून काही शिकण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आणीबाणी आणि इंदिरा गांधींच्या भूमिकेवर सोनिया गांधी काय म्हणाल्या?
1975 च्या आणीबाणीच्या काळावर भाष्य करताना सोनिया गांधींनी अत्यंत संतुलित भूमिका मांडली. “आणीबाणीसाठी केवळ संजय गांधी जबाबदार नव्हते, तर इंदिरा गांधींवर त्यांच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांचाही मोठा दबाव होता. राजीव गांधी लोकांच्या तक्रारी इंदिराजींना सांगत असत. आणीबाणी संपल्यानंतरच मला तिची गंभीरता समजली.”
इंदिरा गांधींनी परिस्थिती सुधारून माफी मागितली
“त्या काळात हिंसक निदर्शने, जाळपोळ आणि सशस्त्र दलांना आदेश धुडकावण्याचे आवाहन केले जात होते, अशा कठीण परिस्थितीशी श्रीमती गांधी झुंजत होत्या. मात्र, अखेरीस त्यांनी स्वतःच परिस्थिती समजून घेतली, मार्च 1977 मध्ये निवडणुका घेतल्या आणि आणीबाणीतील अत्याचारांबद्दल जाहीर माफीही मागितली.”
राजीव गांधींना भेटल्याच्या 60 वर्षांनंतरही मी तीच आहे
आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि ‘बिलॉन्गिंग’ पुस्तकाच्या लेखनप्रवासावर बोलताना सोनिया गांधी भावुक झाल्या. “माझ्यावर किमान 75 पुस्तके लिहिली गेली आहेत, पण मी ती कधीच वाचली नाहीत. 10 वर्षांपूर्वी मी स्वतः लिहायला सुरुवात केली आणि गेल्या 5 वर्षांत ते गांभीर्याने पूर्ण केले. या पुस्तकाच्या प्रकाशकावरून (पेंग्विनऐवजी हार्परकॉलिन्स) झालेल्या वादात मला पडायचे नाही.”
भारत आणि गांधी कुटुंबाशी अतुट नाते
“ही केवळ राजीव आणि माझी प्रेमकथा नाही, तर ज्या देशावर राजीव यांचे प्रेम होते त्या भारताशी आणि या कुटुंबाशी मी कशी एकरूप झाले, याची ही कथा आहे. इटलीतील बालपणीचे संस्कार आजही जपले आहेत. राजीव भेटले त्या 60 वर्षांपूर्वीचीच मी आजही आहे; फरक इतकाच की त्या वेळी मी खूप आनंदी असायचे आणि मनमोकळेपणाने हसायचे!”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App