विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांमधून काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या निधीत अवघ्या एका वर्षात तब्बल 75% इतकी मोठी घट झाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात पक्षाला ₹517.39 कोटींची देणगी मिळाली होती; मात्र 2025-26 मध्ये हा आकडा घसरून थेट ₹130.69 कोटींवर आला आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पक्षाच्या योगदान अहवालाच्या विश्लेषणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या एका दशकातील काँग्रेसच्या देणग्यांमध्ये झालेली ही सर्वाधिक वेगवान घसरण ठरली आहे. यापूर्वी 2015-16 मध्ये काँग्रेसच्या घोषित देणगीत 86% घट होऊन ती ₹141.46 कोटी राहिली होती. वृत्तसंस्था ‘पीटीआय’ने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, या ताज्या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे ‘प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट’कडून मिळणाऱ्या निधीत झालेली मोठी घट हे आहे.
प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्टची देणगी 88% घटली; काँग्रेसला मोठा आर्थिक फटका!
काँग्रेसच्या निधीत झालेल्या या मोठ्या घसरणीत इलेक्टोरल ट्रस्टच्या योगदानाने निर्णायक भूमिका बजावली आहे. प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून काँग्रेसला 2024-25 मध्ये ₹216.34 कोटींची देणगी मिळाली होती. ती 2025-26 मध्ये घसरून केवळ ₹25 कोटींवर आली आहे, म्हणजेच यात सुमारे 88% घट झाली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या ताज्या देणगी अहवालात प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट हा एकमेव नोंदणीकृत ट्रस्ट आहे.
इतर बड्या देणगीदारांचा तपशील
मोठ्या वैयक्तिक आणि कॉर्पोरेट योगदानकर्त्यांमध्ये ‘स्टार सीमेंट’ने ₹5 कोटी, सज्जन भजांका यांनी ₹4 कोटी आणि प्रेम कुमार भजांका यांनी ₹2 कोटींचे योगदान दिले आहे.
भाजपला सर्वाधिक फायदा
प्रूडंट ट्रस्ट हे कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांचे देशातील सर्वात मोठे संकलन केंद्र असून ते आपल्या इच्छेनुसार राजकीय पक्षांना निधी वाटते. गेल्या 10 वर्षांपासून या ट्रस्टच्या निधीचा सर्वाधिक फायदा भाजपला मिळत आला आहे.
इलेक्टोरल बाँड्स आणि 2020-21 नंतरची सर्वात नीचांकी पातळी
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचे सखोल विश्लेषण केले असता काँग्रेसच्या निधीचे काही महत्त्वाचे पैलू समोर आले आहेत. 2025-26 मधील ही आकडेवारी निवडणूक रोख्यांशिवाय आहे. ज्या काळात इलेक्टोरल बाँड्स योजना लागू होती, तेव्हा त्यातून मिळालेला निधी स्वतंत्रपणे जाहीर केला जात असे. जर मागील वर्षांच्या आकडेवारीत इलेक्टोरल बाँड्सची रक्कम जोडली, तर 2025-26 मध्ये काँग्रेसला मिळालेली देणगी ही 2020-21 नंतरची सर्वात कमी देणगी ठरली आहे.
पक्षाचे एकूण उत्पन्न अद्याप गुलदस्त्यात
केवळ मोठ्या देणग्यांचा अहवाल समोर आला असला तरी पक्षाचे एकूण उत्पन्न किती, याचे चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. योगदान अहवालात केवळ ₹20,000 पेक्षा जास्त रकमेच्या देणग्यांचा समावेश असतो. पक्षाच्या एकूण उत्पन्नात लहान देणग्या, सदस्यत्व शुल्क, कूपनमधून मिळालेला निधी आणि बँक व्याजाचा समावेश असतो. काँग्रेसचे 2025-26 चे लेखापरीक्षित खाते अद्याप आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड झालेले नाही.
मागील वर्षी कूपनमधून ₹350.12 कोटी मिळाले होते
2024-25 या आर्थिक वर्षात काँग्रेसला केवळ कूपन विक्रीतून ₹350.12 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे यंदाचे ऑडिटेड अकाऊंट समोर आल्यानंतरच पक्षाची संपूर्ण आर्थिक स्थिती स्पष्ट होणार आहे.
भाजपला मागील वर्षी मिळाले होते ₹6,074.02 कोटी
राष्ट्रीय पातळीवर निधी संकलनात भाजप आणि काँग्रेस यांच्यात मोठी तफावत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भाजपला तब्बल ₹6,074.02 कोटींची देणगी मिळाली होती, जी काँग्रेसला मिळालेल्या देणगीपेक्षा जवळपास 12 पट अधिक होती. गेल्या 12 आर्थिक वर्षांची आकडेवारी पाहता, प्रत्येक वर्षी भाजपला काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने अधिक देणगी मिळाली आहे.
भाजपच्या 2025-26 च्या आकड्यांची प्रतीक्षा
2025-26 या आर्थिक वर्षातील भाजपचा योगदान अहवाल अद्याप निवडणूक आयोगाने सार्वजनिक केलेला नाही; त्यामुळे यंदा भाजपला किती निधी मिळाला, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App