विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून पेटलेला राजकीय वणवा आता थेट महायुतीच्या तंबूत शिरला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारने नियम बदलून मतदानाच्या अधिकारासह 5 तज्ज्ञ (शासकीय) सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीपाठोपाठ आता महायुतीतील घटकपक्षांनीच सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध करत घरचा अहेर दिला आहे. Bachchu Kadu
“जर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या बहुमतावर असे सदस्य लादून निर्णय फिरवायचे असतील, तर मग पर्यायाने निवडणुका घेतल्याच कशाला? स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार कुठेच नसतो; पण या प्रकरणात मतदानाच्या अधिकारासहित प्रशासकीय सदस्य पाठवणे हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे,” अशा कडक शब्दांत बच्चू कडू यांनी सरकारचे कान टोचले आहेत.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनीही पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार प्रहार करत, “गोकुळच्या नावाने चिटिंग थांबवा, देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळ मोठी झाली का?” असा रोखठोक सवाल उपस्थित केला आहे.
उद्या सत्ता बदलली तर हीच चुकीची पद्धत अंगाशी येईल!”: बच्चू कडूंचा सरकारला इशारा
गोकुळ दूध संघातील सतेज पाटील गटाचे स्पष्ट बहुमत डावलून सरकारने केलेल्या प्रशासकीय हस्तक्षेपावर बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “निवडणुकीच्या पूर्वी जर 2 स्वीकृत सदस्य घेतले असते किंवा अगोदरपासूनच एखादा सदस्य वाढवला असता, तर ते एकवेळ मान्य करता आले असते. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नियम बदलून प्रशासकीय सदस्य नेमणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.”
मतदानाचा अधिकार देणे लोकशाहीविरोधी
“आम्ही आजपर्यंत पाहत आलो आहोत की, स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार कुठेही नसतो. मात्र गोकुळच्या प्रकरणात तुम्ही मतदानाच्या अधिकारासहित 5 शासकीय सदस्य पाठवत असाल, तर हा थेट लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.”
सत्तेचा गैरवापर नको
सरकारला भविष्यातील धोक्याची जाणीव करून देताना कडू म्हणाले, “आज आपल्याकडे सत्ता आहे म्हणून आपल्याला हे सगळे सोयीचे आणि बरे वाटते. पण उद्या सत्ता बदलली आणि हीच चुकीची पद्धत अशीच वाढीस लागली, तर त्याचे मोठे नुकसान भोगावे लागेल.”
ओठावर एक अन् पोटात एक नको; गोकुळच्या नावाने चिटिंग थांबवा!”: रवींद्र धंगेकर
महायुतीतीलच दुसरे नेते रवींद्र धंगेकर यांनीही गोकुळच्या स्वायत्ततेवर घाला घातल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीची पोलखोल केली. “1950 मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याला आज 70 ते 80 वर्षे झाली आहेत. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या गोकुळ दूध संघात निव्वळ सत्तेसाठी इतका हस्तक्षेप करणे पूर्णपणे गैर आहे.”
मागील दाराने संचालक घुसवणे ही शुद्ध लबाडी
“ओठावर एक आणि पोटात एक असे चालणार नाही. जे पोटात आहे तेच ओठावर असले पाहिजे. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर ठेवूनच कामकाज केले पाहिजे. तांत्रिक त्रुटी काढून अध्यक्ष निवडीला विलंब लावणे आणि मागील दाराने संचालक घुसवणे ही शुद्ध लबाडी आहे.”
देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळ मोठी झाली का?
“सहकारात राजकीय हस्तक्षेप नसावा, ही सर्वपक्षीय परंपरा राहिली आहे. पण आज देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळची निवडणूक मोठी झाली आहे का, असा प्रश्न पडतो. यात असे काय दडले आहे की सत्तेसाठी एवढा अट्टाहास सुरू आहे?” असा सवालही धंगेकर यांनी केला.
महायुतीत चौफेर नाराजी; सरकारची मोठी कोंडी
गोकुळ दूध संघाच्या 25 संचालकांच्या निवडीत सतेज पाटील यांच्या आघाडीने 13 जागा जिंकून बहुमत मिळवले असताना, 14 च्या कोरमचा अडसर निर्माण करून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा घाट घातला गेला आहे. या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात ‘संघर्ष मोर्चा’ पुकारला असतानाच, आता बच्चू कडू आणि रवींद्र धंगेकर या महायुतीतील नेत्यांनीच सरकारवर तोफ डागल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App