विशेष प्रतिनिधी
बस्तर (छत्तीसगड): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 13 व्यांदा देशाच्या वीर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली परंपरा कायम राखत यंदा छत्तीसगडमधील बस्तरच्या जंगलात जाऊन सीआरपीएफ (CRPF) जवानांचा उत्साह द्विगुणीत केला. बस्तर येथील कोब्रा ऑपरेशन्स बेसमध्ये (CoBRA Operations Base) जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी 42 मिनिटांचे अत्यंत स्फूर्तीदायक भाषण केले. “40 ते 50 वर्षांत पहिल्यांदाच देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादापासून मुक्त झाला असून यंदाची 2026 ची दिवाळी अत्यंत ऐतिहासिक आहे. जंगलातील शस्त्रधारी नक्षलवाद्यांचा तर खात्मा झाला आहे; पण आता विविध संघटनांवर ताबा मिळवून संविधान आणि लोकशाहीविरुद्ध जनतेला भडकवणाऱ्या ‘वैचारिक नक्षलवाद्यांची’ (अविचारी नक्षलवादी) ओळख पटवून त्यांच्याशी निर्णायक लढा द्यावा लागेल,” असा मोठा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. PM Modi Celebrates Diwali
जवानांना उद्देशून “तुम्ही सर्व माझ्या कुटुंबाचा भाग आहात,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी गेल्या 12 वर्षांतील अंतर्गत सुरक्षेचे यश, पूर्वीच्या सरकारांचे अपयश आणि भारताच्या गरिबी निर्मूलनाचा लेखाजोखा मांडला.
पंतप्रधान मोदींच्या बस्तर भाषणातील 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
सीआरपीएफ जवानांसमोर बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या बदलेल्या सुरक्षा चित्राचे 5 प्रमुख पैलू अधोरेखित केले.
1. 40-50 वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण देश नक्षलमुक्त: दिवाळी 2026 ही स्वतंत्र भारताच्या इतिहासात अत्यंत खास ठरली आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांत पहिल्यांदाच देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादाच्या विळख्यातून मुक्त झाला असून लाखो नागरिकांनी नक्षलवादाची भीती मागे टाकली आहे.
2. 47 वर्षांत प्रथमच वर्षभरात एकही CRPF जवान शहीद नाही: गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना एकाही सीआरपीएफ जवानाने आपले प्राण गमावले नाहीत. 47 वर्षांनंतर घडलेली ही ऐतिहासिक घटना सुरक्षा दलांचे अद्वितीय शौर्य, धैर्य, संयम आणि सरकारच्या सुयोग्य धोरणांचा मोठा विजय आहे.
3. 2004 ते 2013 दरम्यान नक्षलवाद्यांपेक्षा आपले सैनिक जास्त शहीद झाले: पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना मोदी म्हणाले की, 2004 ते 2013 या काळात दरवर्षी नक्षलवाद्यांपेक्षा आपलेच अधिक शूर सैनिक शहीद होत होते. तत्कालीन सरकारांनी नक्षलवादाला ‘असाध्य रोग’ मानून या समस्येकडे दुर्लक्ष केले होते.
4. जंगलातील नक्षलवाद संपला, आता ‘वैचारिक नक्षलवाद्यांचा’ धोका: जंगलांमधून सशस्त्र नक्षलवाद्यांना संपवण्यात आले असले तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. या ‘वैचारिक नक्षलवाद्यांनी’ अनेक संघटनांवर ताबा मिळवला असून ते देशाला संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहेत; त्यांची ओळख पटवून त्यांना रोखणे आवश्यक आहे.
5. 12 वर्षांत 50 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर: जागतिक बँकेच्या (World Bank) अहवालाचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी सांगितले की, सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे गेल्या 12 वर्षांत भारतातील तब्बल 50 कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.
दंतेवाडा ते बस्तर: रक्तरंजित भूतकाळातून विकासाच्या नव्या लाटेकडे!
माओवादी दहशतवादाविरुद्धचा लढा किती कठीण होता, याची आठवण करून देताना मोदींनी काही काळ्या दिवसांचा उल्लेख केला. एकेकाळी नक्षलवाद्यांनी सामान्य नागरिकांचा मतदानाचा हक्कही हिरावून घेतला होता आणि नक्षलवादी हल्ल्यांची संख्या एका वर्षात 2,000 पर्यंत पोहोचली होती. 2010 मध्ये जवळच्याच दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या भीषण चकमकीत 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, तर त्याच वर्षी दंतेवाडातील आणखी एका घटनेत 44 निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.
अंतर्गत सुरक्षा मजबूत तर बाह्य शत्रू निष्प्रभ
“मी 1.4 अब्ज देशवासियांच्या वतीने तुमच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे. जेव्हा देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत असते, तेव्हा बाह्य शत्रू यशस्वी होऊ शकत नाहीत; पण अंतर्गत सुरक्षा कमकुवत होते तेव्हा बाह्य शत्रूही डोके वर काढतात. सीमेवर लष्कर जी भूमिका बजावते, तीच भूमिका तुम्ही देशांतर्गत बजावत आहात,” असे म्हणत मोदींनी जवानांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींची सलग 13 वी ‘जवान दिवाळी’
सत्तेत आल्यापासून दरवर्षी सीमावर्ती भागात किंवा दुर्गम सुरक्षा तळांवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान मोदींनी यंदाही कायम ठेवली. बस्तरची ही दिवाळी पंतप्रधानांची जवानांसोबतची सलग 13 वी दिवाळी ठरली आहे.
मागील 12 वर्षांचा लेखाजोखा
यापूर्वीच्या 12 दिवाळींमध्ये पंतप्रधानांनी देशाच्या विविध सीमावर्ती भागांना भेट दिली आहे. यामध्ये त्यांनी सर्वाधिक 3 वेळा जम्मू-काश्मीरला भेट दिली असून, हिमाचल प्रदेश आणि लडाख येथे प्रत्येकी 2 वेळा जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App