विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून राज्याच्या राजकारणात दररोज नवनवे वाद उफाळून येत असतानाच, आता महायुतीतील घटक पक्षांमध्येच जोरदार शाब्दिक जुगलबंदी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचा दावा शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री संजय शिरसाट यांनी केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिरसाट यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “संजय शिरसाट यांना आमच्या पक्षाच्या अंतर्गत विषयावर भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला? आम्ही कधी तुमच्या पक्षाच्या घडामोडींवर प्रतिक्रिया देतो का? तुमच्याकडेही आता 2 शिवसेना झाल्या आहेत; मग तुम्ही विलीनीकरणाचा पर्याय का स्वीकारत नाही? आधी आपल्या ताटातलं निस्तरावं आणि मगच दुसऱ्यांच्या ताटात डोकवावं,” असा सणसणीत टोला उमेश पाटील यांनी संजय शिरसाट यांना लगावला आहे.
तुमच्या 2 शिवसेना एकत्र आल्या तर अध्यक्ष कोण राहणार—एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?
संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केल्यानंतर उमेश पाटील यांनी थेट शिवसेनेतील फुटीचा मुद्दा उपस्थित करत शिरसाट यांची कोंडी केली. “तुमच्याकडेही आता 2 शिवसेना झाल्या आहेत. मग तुम्हीही विलीनीकरणाचा पर्याय का स्वीकारत नाही? समजा तुमच्या पक्षाचे विलीनीकरण करण्याचे ठरले, तर उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष राहणार की एकनाथ शिंदे अध्यक्ष राहणार, याचे उत्तर आधी द्या.”
2-2 जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे काय करणार?
केवळ पक्षाध्यक्षपदाचाच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरही अनेक मोठे प्रश्न निर्माण होतील, असे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. “दोन्ही शिवसेनांचे विलीनीकरण झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या 2-2 जिल्हाध्यक्षांपैकी कोणाला पदावर ठेवणार आणि कोणाला पदावरून दूर करणार? तालुका स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि संघटनेतील इतर पदांबाबत काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना संधी देणार?” असे अनेक बोचरे सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केले.
आमच्या विलीनीकरणाची चिंता तुम्हाला कशाला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. त्यातच संजय शिरसाट यांनी ‘विलीनीकरण अंतिम टप्प्यात आहे’ असे विधान केल्याने उमेश पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “संजय शिरसाट यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत विषयावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला, हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही कधी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करतो का? मग त्यांनी आमच्या विलीनीकरणाची चिंता करण्याचे कारण काय?”
टीव्हीवर चर्चा होत नाही म्हणून आमच्या पक्षात ढवळाढवळ नको
“तुमच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत टीव्हीवर किंवा माध्यमांमध्ये चर्चा होत नाही, म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अशा पद्धतीने चर्चा करणे योग्य नाही. हा पूर्णपणे आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय असून त्यावर आमचे नेते निर्णय घेतील. त्यामुळे शिरसाट यांनी आपल्या पक्षातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
शरद पवार यांच्या प्रकृतीवर राजकारण करू नका!
अखेरीस उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्येतीचा उल्लेख करत सर्वच राजकीय नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. “शरद पवार साहेबांना घशाचा संसर्ग झाला होता आणि ते नुकतेच ब्रीच कँडी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत सातत्याने राजकीय विधाने करणे आणि विलीनीकरणासारख्या राजकीय चर्चा सुरू ठेवणे अजिबात योग्य नाही,” असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App