ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; चार वेगवेगळ्या आराखड्यांत उभारणार वसतिगृहे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची वसतिगृहे उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांतील जागा निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच उपलब्ध जागेनुसार चार पर्यायी आराखड्यांमध्ये वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. OBC students

मंत्रालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची उभारणी, जागांची उपलब्धता आणि बांधकामाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. वसतिगृहांच्या इमारती, खोल्यांची रचना आणि आवश्यक सुविधांसाठी चार पर्यायी आराखडे तयार करून संबंधित जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जागेनुसार बांधकाम करावे, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

२० जिल्ह्यांत जागा निश्चित; उर्वरित जिल्ह्यांना निर्देश

इतर मागास बहुजन कल्याण विभागाला वसतिगृहे आणि कार्यालयांच्या बांधकामासाठी एक रुपया नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

या प्रक्रियेत आतापर्यंत २० जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित झाली आहे. उर्वरित जिल्ह्यांतील जागा निश्चितीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जागेच्या उपलब्धतेनुसार चार वेगवेगळ्या आराखड्यांचा वापर केल्यास सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृहांच्या उभारणीला गती मिळू शकणार आहे.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष उपक्रम

या बैठकीत महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. उपसमितीने ‘महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी’ या विशेष बोधचिन्हाच्या संकल्पनेची निवड केली आहे.

महाज्योतीने दुष्काळ निवारणाशी संबंधित कार्यक्रम तयार करून समितीसमोर सादर करावा. तसेच महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याच्या प्रती छापून वितरणासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले. पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे कामही लवकर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली.



फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विकासाला गती

पुण्यातील फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. राज्य संरक्षित फुलेवाड्यापासून सुमारे १५० मीटर अंतरावर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीतील सावित्रीबाई फुले स्मारकाला जोडणारा रस्ता विकसित करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

याशिवाय फुलेवाडा परिसरातील आवश्यक जागांचे भूसंपादन करून स्मारक विस्ताराची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ नायगाव, महात्मा फुले यांचे जन्मस्थळ कटगुण (जि. सातारा) आणि सत्यशोधक समाजाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांच्या जतन व विकासकामांचाही आढावा घेण्यात आला.

विद्यापीठे आणि शालेय अभ्यासक्रमांत फुले यांच्या साहित्याचा समावेश

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अध्यासनांची स्थापना करण्याच्या सूचना उपसमितीने केल्या आहेत. विद्यमान अध्यासनांवरील रिक्त पदे तातडीने भरून ती कार्यरत करण्याचेही निर्देश देण्यात आले.

विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह सीबीएसई, राज्य मंडळ आणि अन्य शिक्षण मंडळांच्या शालेय अभ्यासक्रमांमध्ये महात्मा फुले यांच्या साहित्याचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली.

फुले दाम्पत्याचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी शासनाच्या वतीने परदेशातील विद्यापीठांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, फेलोशिप आणि शिष्यवृत्ती योजना राबविण्याचाही विचार करण्यात आला.

जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांनी विशेष उपक्रम राबवावेत, तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यानमाला, निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावे, अशा सूचना करण्यात आल्या. प्रत्येक शाळेत ११ एप्रिल रोजी प्रभातफेरी, अभिवादन कार्यक्रम आणि विशेष व्याख्यान आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला उपसमितीचे सदस्य तथा मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, संजय राठोड आणि अतुल सावे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Major government decision for OBC students; hostels to be built under four different models

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात