विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. शिवाजीनगर येथील मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्ट म्हणून विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्यात संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला.
या प्रकल्पामुळे पुणेकरांसह राज्याच्या विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी वाहतूक सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे, शिवाजीनगर मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक आणि एसटी बसस्थानक यांची एकमेकांशी थेट जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका वाहतूक व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
१० हजार ५०० चौरस मीटर जागेवर अत्याधुनिक बस पोर्ट
शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या सुमारे १५ हजार ४०० चौरस मीटर जागेवर हा संयुक्त विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ४ हजार ९०० चौरस मीटर जागेवर महामेट्रोने मेट्रो स्थानक उभारले आहे. तर उर्वरित सुमारे १० हजार ५०० चौरस मीटर जागेवर अत्याधुनिक बस पोर्ट आणि व्यावसायिक सुविधांचा विकास केला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी महामेट्रोची प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. प्रस्तावित बस पोर्टमध्ये एसटी बस टर्मिनस, बस आगार, बस पार्किंग, व्यावसायिक आणि कार्यालयीन जागांसह प्रवाशांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मेट्रो, रेल्वे आणि एसटी एकाच ठिकाणी जोडणार
या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेट्रो, रेल्वे आणि एसटी या तिन्ही सार्वजनिक वाहतूक सेवांची एकात्मिक जोडणी. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार असून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक सोयीस्कर होणार आहे. पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या बांधकामासाठी सध्याचे शिवाजीनगर एसटी बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा महामेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर येथील नवीन बस टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर एसटी बसस्थानक पुन्हा मूळ जागेवर सुरू करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही होणार वाढ
या संयुक्त विकास प्रकल्पात एसटी महामंडळाच्या जमिनीचे मूल्यांकन आणि प्रकल्पातील गुंतवणुकीचा वाटा विचारात घेऊन महसूल वाटप निश्चित केले जाणार आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या चार टक्के पर्यवेक्षण शुल्क महामेट्रोला मिळणार आहे. तसेच प्रकल्पासाठी ४९ अधिक ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्याचा विचार करण्यात आला असून, शासनाच्या लागू नियमांचे पालन केले जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या मालकीच्या जागेचा नियोजनबद्ध वापर करून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करणे, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समन्वय मजबूत करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
एकूणच, शिवाजीनगर बसस्थानकाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मेट्रो, रेल्वे आणि एसटी प्रवाशांना एकाच ठिकाणी एकात्मिक वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App