विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अमित कुमार याने अटकेपूर्वी पाच दिवस बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवल्याचा आरोप करत दाखल केलेली याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे. कथित बेकायदेशीर ताब्याचे पुरावे मिळवण्यासाठी कॉल डिटेल रेकॉर्ड, पोलिस वाहनांच्या नोंदवहीतील तपशील आणि विमान प्रवासाची माहिती जतन करण्याची मागणी त्याने केली होती. मात्र, कथित ताब्याबाबत आवश्यक तपशील अर्जात स्पष्टपणे नमूद नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. Baba Siddique Murder Case
अटकेपूर्वी पाच दिवस ताब्यात ठेवल्याचा आरोप
हरियाणातील कैथल येथील रहिवासी अमित कुमार याला २३ ऑक्टोबर २०२४ रोजी औपचारिकरीत्या अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी मुंबई पोलिसांनी आपल्याला पाच दिवस ताब्यात ठेवल्याचा आरोप त्याने केला होता.
या आरोपाच्या पुष्टीसाठी कैथल येथे गेलेल्या पोलिस पथकातील अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड, कैथल पोलिस ठाण्याच्या वाहनांची नोंदवही तसेच त्याला मुंबईला आणण्यासाठी वापरलेल्या विमानाच्या प्रवासी यादीतील माहिती जतन करून सादर करण्याची मागणी अमित कुमारने न्यायालयाकडे केली होती.
सरकारी पक्षाचा याचिकेला विरोध
सरकारी विशेष अभियोक्ता महेश मुळे यांनी या याचिकेला विरोध केला. अमित कुमारला निर्धारित नियम आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.
तपास अधिकाऱ्यानेही अभियोजन पक्षाची बाजू मांडताना कैथल पोलिस ठाणे आणि मुंबईतील खंडणीविरोधी कक्षाच्या स्टेशन डायरीतील नोंदींचा संदर्भ दिला. बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांच्या वतीने बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनीही ही याचिका कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचा युक्तिवाद केला.
आरोप गंभीर; मात्र ठोस तपशील देणे आवश्यक
बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा असून, तो सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तींवर गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, असे न्यायालयाने नमूद केले. मात्र, केवळ आरोपाच्या आधारे मागणी केलेली सर्व कागदपत्रे मागवून चौकशी सुरू करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कथितरीत्या ताब्यात घेतल्याची तारीख, वेळ, ठिकाण, त्या वेळची परिस्थिती आणि संबंधित व्यक्ती किंवा यंत्रणांची माहिती अर्जात स्पष्टपणे देणे आवश्यक होते. मात्र, अमित कुमारच्या अर्जात हे आवश्यक तपशील नसल्याने न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App