विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामान्य माणसाच्या मनात सतत धुमसणारा राग, व्यवस्थेने केलेला अपमान, व्यवस्थेबद्दलची घृणा आणि वर्गसंघर्ष यांच्या अंतरंगातील ‘प्रेशर कुकर’ची वाफ आपल्या अफाट ताकदीने पडद्यावर बाहेर काढणारा एक अद्वितीय चेहरा आज आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. नाना पाटेकर किंवा अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलावंतांनी सामान्यांच्या मनातील ही धुमसती वाफ पडद्यावर दोन हात करून बाहेर काढली, म्हणून हा देश टिकला; अन्यथा या देशात दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रवासावर सविस्तर पाेस्ट लिहिली आहे. राज ठाकरे म्हणाले, “हिंदी सिनेसृष्टी म्हणजे मुंबई हे समीकरण जितके खरे, तितकेच मुंबई आली की इथली प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक सिनेमा, झोपडपट्ट्या आणि चाळींमधून रोज अस्तित्व शोधणारा मध्यमवर्ग व कामगार वर्ग आला. गिरण्या बंद पडल्यानंतर उध्वस्त झालेला कामगार वर्ग, त्या नैराश्यातून जन्मलेले अंडरवर्ल्डचे साम्राज्य, विस्कटलेला सामाजिक सलोखा आणि त्यानंतर उदारीकरणानंतर विस्तारलेल्या मध्यमवर्गाच्या आकांक्षा—या प्रत्येक कालखंडाभोवती फिरणारे राजकारण नानांच्या कामातून थेट झळकले. हमीदाबाईची कोठी’ या नाटकापासून सुरू झालेला हा प्रवास ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अब तक छप्पन’ ते अगदी ‘नटसम्राट’पर्यंत सतत विस्तारत राहिला. या प्रत्येक टप्प्यावर काळजात अस्वस्थता उराशी बाळगून जगणारा सामान्य माणूस नानांनी कधी रंगभूमीवर तर कधी मोठ्या पडद्यावर तितक्याच ताकदीने जिवंत केला.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सामान्य माणसाच्या नशिबी सतत अपमान, लाचारी, वर्गसंघर्ष आणि शक्तिहीनता येते. हे सगळे त्याच्या मनात प्रेशर कुकरसारखे आत रटरटत, धुमसत राहते. कधीतरी घरातील किरकोळ भांडणांतून ते बाहेर पडते, नाहीतर आतच खदखदत राहते. नानांच्या अभिनयाकडे पाहताना हा सामान्यांच्या भावनांचा जळजळीत प्रेशर कुकरच आपण पाहतोय असा प्रत्यय यायचा. लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब आणि अनेक संगीतकारांनी 60-70 वर्षे भारतीयांचे मन रिझवले; तसेच नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी सामान्यांच्या मनातील ही धुमसती आग अभिनयातून बाहेर काढून समाजाला एक वाट मोकळी करून दिली. म्हणूनच देशात शांतता राहिली, अन्यथा इथे दर महिन्याला अराजकतेचा भडका उडाला असता.
नाना पाटेकरांच्या अभिनयाची तुलना हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मॉर्गन फ्रीमन यांच्याशी करताना राज ठाकरे यांनी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण मांडले. “दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या पारंपरिक देखण्या चौकटीत बसणारे कलाकार नव्हते. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यावर असे वाटते की या माणसाने काळाच्या ओघात अफाट शहाणपण, प्रचंड संयम आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारण्याचे शहाणपण आत्मसात केले आहे. दुसऱ्या बाजूला नानांच्या अभिनयात अनिर्बंध राग, चंचलता आणि खोल साठलेले नैराश्य जाणवायचे. ‘या माणसाने जगात खूप काही बघितले आहे’ असा भास मॉर्गन फ्रीमन निर्माण करतात, तर ‘या माणसाने व्यवस्थेचे खूप भोगले आहे, आता बस झाले!’ असा विद्रोही हुंकार नानांच्या अभिनयातून उमटायचा. माणसाच्या या दोन परस्परविरोधी टोकांपैकी दुसरे बंडखोर टोक नानांनी मनस्वीपणे पडद्यावर उतरवले, म्हणूनच ते महान ठरले.” 2000च्या दशकात गोरे-गोमटे, आखीव-रेखीव आणि गुळगुळीत चेहरे असलेल्या नटांऐवजी मूळ कथा पडद्यावर केंद्रस्थानी आली. ती ताकदवान कथा खांद्यावर वाहून नेणारे आणि केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खेचून आणणारे नट लोकप्रिय होऊ लागले. या संपूर्ण युगाचे ‘पहिले नायक’ 100 टक्के नाना पाटेकरच होते. आज ज्या चरित्र अभिनेत्यांची चलती दिसते आहे, ती पायवाट नानांनीच तयार केली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नाना म्हणजे केवळ आक्रमक, संतापी किंवा गंभीर अभिनय नव्हे; तर ‘वेलकम’सारख्या चित्रपटातून त्यांनी उदय शेट्टीची अफलातून विनोदी भूमिका साकारून आपण कोणत्याही पठडीत तितक्याच ताकदीने उभे राहू शकतो, हे जगाला दाखवून दिले, असे काैतुक राज ठाकरे यांनी केले आहे.
नानांचा स्वभाव अत्यंत मनस्वी होता. मनात येईल ते थेट बोलायचे, कमालीचे फटकळ होते (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणे चुकीचेच ठरेल, असो!). यामुळे नानांना भूमिकेत घेण्याची तीव्र इच्छा असूनही अनेक निर्माते-दिग्दर्शक त्यांना टाळायचे. यामुळे नानांचे वैयक्तिक नुकसान झाले की नाही ठाऊक नाही, कारण ते मुळातच बेफिकीर वृत्तीचे होते; पण हिंदी चित्रपटसृष्टीचे आणि रसिकांचे 100 टक्के अतोनात नुकसान झाले, असे निरिक्षण राज ठाकरे यांनी नाेंदविले आहे. नानांनी जर स्वभावात काही व्यावहारिक तडजोडी केल्या असत्या, तर दिवंगत इरफान खान किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारख्या गुणी कलाकारांना नंतरच्या काळात ज्या भूमिका व संधी मिळाल्या, त्या मिळाल्या असत्या का, अशी शंका मनात आल्यावाचून राहत नाही.”
“नाना गेले… पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो सामान्य माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला जिवंत आहे. त्याचा राग अजूनही आहे, त्याची अस्वस्थता, त्याचा अपमान, जगण्यासाठीची त्याची रोजची धडपड आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकद आजही आपल्यात आहे. म्हणूनच नानांना निरोप देताना आपण केवळ एका महान अभिनेत्याला निरोप देत नाही आहोत; तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक ज्वलंत चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App