विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी विविध पक्षांतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पारंपरिक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांना बैठकीचे निमंत्रण न दिल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेत आपल्याला सहभागी करून घेतले नसल्याने लंके यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
‘या जिल्ह्याचा खासदार आहे, मला बोलवायला हवे होते’
बैठकीला निमंत्रण न मिळाल्याबाबत बोलताना निलेश लंके यांनी, “या बैठकीचे मला निमंत्रण नव्हते. या जिल्ह्याचा मी खासदार आहे. त्यामुळे मला बैठकीला बोलवायला हवे होते. माझ्याही मतदारसंघात आठ तालुके आहेत,” अशी भूमिका मांडली.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने कोणी वैयक्तिक हेवे-दावे काढत असेल तर ते योग्य नसल्याचे लंके यांनी म्हटले.
‘थोरात आमचे नेते, त्यांच्याशी नक्की बोलेन’
आपल्याला बैठकीला का बोलावण्यात आले नाही, याबाबत बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार का, असा प्रश्न लंके यांना विचारण्यात आला. त्यावर “बाळासाहेब थोरात हे आमचे नेतेच आहेत. त्यांच्याशी नक्की बोलेन,” असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या नेत्यांच्या बैठकांमध्ये निलेश लंके यांना सहभागी करून घेतले जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
साताऱ्यातही जिल्हा बँकेसाठी बैठकांचा धडाका
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
मंत्री मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत त्यांनी चर्चा केल्याचे समोर आले आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये एकमत घडवून आणण्याची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात अहिल्यानगर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा बँकांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App