विशेष प्रतिनिधी
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त आपल्या दरे या गावी आले आहेत. जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त त्यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना लंडन दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि शेतीतील नवीन प्रयोगांबाबतही माहिती दिली.
दरे गावी आलो की विरोधकांना पोटदुखी : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी गणेशोत्सवानिमित्त दरे गावी आलो आहे. मी नाराज नाही. मात्र, मी या भागात आलो की काही लोकांना नेहमीच पोटदुखी होते. त्यामुळे आता पोटदुखीवर कोणते झाड आहे, याचा शोध घेणार आहे. त्याची लागवड करणार आहे किंवा त्यांना जमालगोटा दिला पाहिजे.”
“मी गावी आलो, दिल्लीत गेलो किंवा लंडनला गेलो, तरी विरोधकांना पोटदुखी होते. विरोधकांच्या आरोपांना टीका करून उत्तर देणार नाही. मी माझ्या कामातून उत्तर देईन. मी कामाचा माणूस आहे,” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दुष्काळसदृश्य परिस्थितीवर सरकारची भूमिका
राज्यातील काही भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पालकमंत्री संबंधित भागांचा दौरा करत आहेत. लवकरच आपणही दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या भागांमध्ये पिके करपून गेली आहेत, तिथे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बांबू लागवडीवर भर; शेतीत नवीन प्रयोग
जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. बांबूपासून इथेनॉल, विमानतळांच्या कामांसाठी लागणाऱ्या वस्तूंसह अनेक उपयोगी उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे बांबू लागवडीवर लक्ष केंद्रित करून त्याची लागवड वाढवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शेतात सफरचंद आणि ब्ल्यूबेरीसह कापूर व हिंग या दोन नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे. ब्ल्यूबेरीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी ब्ल्यूबेरी आयात केली जात होती; मात्र आता महाराष्ट्रातही तिची लागवड करता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App