विशेष प्रतिनिधी
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विश्वविक्रमी फलंदाज विराट कोहली याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंडनमध्ये सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विराट कोहलीचे स्वागत केले. तर विराटने लंडनमध्ये मिळालेल्या तीन पुरस्कारांबद्दल शिंदे यांचे अभिनंदन केले. Virat Kohli
राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबतही या भेटीत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच राज्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत शिंदे आणि विराट यांच्यात विचारविनिमय झाला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, कोस्टल रोड, अटल सेतू आणि वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असल्याचे सांगितले. नवी मुंबईजवळ आकारास येत असलेल्या नवीन स्पोर्ट्स सिटीचीही त्यांनी माहिती दिली. या स्पोर्ट्स सिटीमध्ये विविध खेळांसाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या प्रकल्पाला अधिक बळ देतानाच दर्जेदार शिक्षणासोबत मुलांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा विराट कोहलीने व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम राबवले जात असून, त्यातून अधिकाधिक गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्पर्धा आणि उपक्रमांमुळे देशातील तरुणांना विविध खेळांमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे शिंदे यांनी विराटला सांगितले.
“क्रिकेट हे माझे सर्वस्व आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी या खेळासाठी आजही काहीतरी भरीव योगदान देण्याची माझी इच्छा आहे,” असे विराट कोहलीने शिंदे यांच्याशी बोलताना सांगितले. खेळासोबतच आहार आणि फिटनेसचे महत्त्व खेळाडूंना समजावे, यासाठीही आपण प्रयत्न करत असल्याचे विराटने यावेळी सांगितले.
या भेटीवेळी युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल तसेच एकनाथ शिंदे यांचे सहकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App