विशेष प्रतिनिधी
मुंबई: “अजित पवारांनी महाराष्ट्राला विक्रमी अर्थसंकल्प दिले आहेत; त्यांनी सलग 11 अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यामुळे राज्याचे अर्थखाते आम्हालाच मिळाले पाहिजे, ही आमची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या अर्थखात्यावर आपला हक्क सांगितला आहे. बारामती येथे दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे भावुक झाले होते.
या वेळी बोलताना सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट, तसेच विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर आपली परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली.
“विलीनीकरणावर मी बोलणार नाही; सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्षा, त्याच अंतिम निर्णय घेतील!”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाच्या ‘जर-तर’च्या चर्चांवर बोलताना सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध आणि जबाबदार पवित्रा घेतला.j
अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवारांचाच अधिकार
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या जर-तरच्या मुद्द्यावर मी काहीही बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आहेत; त्यामुळे विलीनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्याच घेतील. शरद पवार साहेब हे गेली 6 दशके (60 वर्षे) देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या बाजूचा निर्णय त्यांचा असेल.”
मी गावी होतो, मला कल्पना नाही
“मी दिवाळीनिमित्त माझ्या गावी होतो, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांबद्दल मला काही माहिती नाही. योग्य वेळी अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच या विषयावर अधिकृत भाष्य करू. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट होतच असते, त्याचा कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढून काही फायदा नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही बारामतीला पंढरी मानतो; दादांच्या स्मृतीस्थळी आरोपांना उत्तर देणार नाही!
शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि इतरांकडून होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवर बोलण्यास सुनील तटकरे यांनी नकार दिला.
पवित्र जागेचे महत्त्व कमी करायचे नाही
“आम्ही बारामतीला आमची पंढरी मानतो. इथे कोणाचेही (रामदास कदम आदी) नाव घेऊन मला या पवित्र जागेचे महत्त्व कमी करायचे नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांना अजित पवारांच्या स्मृतीस्थळी उत्तर द्यायचे नाही.
पवार कुटुंबामुळेच आमचे अस्तित्व
“आम्ही आज जे काही आहोत, ते केवळ अजित पवार आणि शरद पवार साहेबांमुळेच आहोत. जसे शरद पवारांचे निवासस्थान हे नेहमीच देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे, तसेच अजित पवारांचे निवासस्थानही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे,” असे तटकरे म्हणाले.
“गेली 30 वर्षे पाडव्याला बारामतीला येतो, पण दादांशिवाय पाडवा मनाला पटणे कठीण!”: तटकरे भावुक
दिवाळी पाडव्याच्या दिवशी बारामतीतील वातावरणाबद्दल बोलताना सुनील तटकरे यांना अश्रू अनावर झाले. “पाडव्याच्या दिवशी अजित पवार आपल्यात नसताना इथे येण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. गेली 30 वर्षे आम्ही न चुकता पाडव्याला बारामतीला येतो; पण या वर्षी बारामतीमध्ये उसळलेला जनसागर आणि लोकांच्या डोळ्यांतील अश्रू आम्ही यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते.”
फक्त स्मृतींसमोर नतमस्तक होण्यासाठी आलो
“बारामतीमधील पाडवा अजित पवारांशिवाय साजरा होत आहे, हे वास्तव मनाला पटणे अत्यंत कठीण आहे. परंतु नियतीच्या पुढे कोणाचे काहीही चालत नाही. आम्ही आज कोणत्याही राजकारणासाठी नव्हे, तर केवळ अजित दादांच्या स्मृतींसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे आलो आहोत,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App