समाजात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी; रोहन पारीखला न्यायालयीन कोठडी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रे तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोहन पारीखला शुक्रवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने ७ सप्टेंबर रोजी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. Rohan Parikh

समाजात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तसेच कुटुंबीय आणि मंगेतरवर प्रभाव पाडण्यासाठी आपण बनावट PMO ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे तयार केल्याची कबुली पारीखने दिल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, २०२५ पासून तो कागदपत्रे तयार करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेशाचा प्रयत्न

पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित बनावट ओळखपत्र दाखवून तीन जणांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बीकेसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा रक्षकांकडे चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे पथक खार येथे पोहोचले आणि रोहन पारीखला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील ओळखपत्राबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.



लॅपटॉप, हार्डडिस्कसह कागदपत्रे जप्त

तपासादरम्यान पोलिसांनी पारीखचा लॅपटॉप आणि हार्डडिस्क जप्त केली. त्याच्या घराच्या झडतीत पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित कागदपत्रेही आढळून आली. ही कागदपत्रे इंग्रजी भाषेत असून, त्याबाबत विचारणा केल्यानंतरही त्याने समाधानकारक माहिती दिली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली असता, पंतप्रधान कार्यालयाच्या नावाने पत्रव्यवहार आणि कागदपत्रे कशी तयार करावीत, यासंदर्भात त्याने इंटरनेटवर शोध घेतल्याचे समोर आले. २०२५ मध्ये चॅटजीपीटीच्या माध्यमातून बनावट ओळखपत्र तयार केल्याचेही तपासात आढळून आले आहे.

अग्निशस्त्राच्या व्यावसायिक वापराबाबतही तपास

या प्रकरणातील तपासादरम्यान दिलीप कुंदेला याच्याकडील अग्निशस्त्राचा व्यावसायिक वापर रोहन पारीख करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात रोहन पारीख आणि दिलीप कुंदेला यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रोहन पारीखला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे

Rohan Parikh sent to judicial custody over alleged intrusion at Modi event

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात