विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. त्यामुळे केवळ आर्थिक सहकार्य आणि व्यापारावर भर न देता मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा, परस्पर सन्मान आणि संवादाच्या माध्यमातून अधिक शांततामय, समतोल आणि समृद्ध जग निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांचे राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.
संवादातून समान मूल्यांचा शोध
जागतिक व्यवस्था सध्या अनेक स्तरांवर असंतुलित आणि विखुरलेली दिसत आहे. अशा परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेणे आवश्यक आहे. संस्कृती, मते आणि विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी संवादाच्या माध्यमातून समान मूल्यांवर आधारित परस्पर समज वाढविता येते, असे फडणवीस यांनी सांगितले.
जग केवळ व्यापार आणि आर्थिक संबंधांच्या माध्यमातून अधिक चांगले होऊ शकत नाही. त्यासाठी विविध देशांतील नागरिक, राजकीय नेते, राजनैतिक प्रतिनिधी, विचारवंत तसेच उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील नेतृत्वाने एकत्र येऊन अनुभव व विचारांची देवाणघेवाण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारताची जीवनदृष्टी
भारताच्या प्राचीन संस्कृतीचा पाया ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारावर आधारित आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भारतीय जीवनदृष्टी असून भारताने इतिहासात केवळ व्यापार आणि वस्तूंचा प्रसार केला नाही, तर ज्ञान, विचार आणि जीवनमूल्येही जगभर पोहोचवली आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बौद्ध धर्माचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, भारतातून अनेक शतकांपूर्वी जगाच्या विविध भागांत पोहोचलेल्या या विचारधारेने मोठा प्रभाव निर्माण केला. विशेष म्हणजे हा प्रभाव युद्ध किंवा हिंसेतून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या सामर्थ्यातून निर्माण झाला.
ब्रिक्स देशांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी
ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या माध्यमातून सांस्कृतिक समानता आणि परस्पर सहकार्याच्या आधारे ब्रिक्स राष्ट्रांमध्ये नव्या भागीदारीच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागतिक स्तरावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम घडवून आणण्यासाठी हा मंच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास संचालक जान्हवी पवार यांनी व्यक्त केला.
भारत-ब्राझील सांस्कृतिक संबंधांचे सादरीकरण
कार्यक्रमात भारत आणि ब्राझीलच्या सांस्कृतिक परंपरांमधील साम्यस्थळे आणि दोन्ही देशांमधील दृढ संबंध अधोरेखित करणारे दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सवांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन यावेळी घडविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जान्हवी पवार आणि एपी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचे अभिनंदन केले. यावेळी विविध देशांचे राजदूत, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, अभ्यासक, समुदाय प्रतिनिधी, राजकीय नेते आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App