विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. या चर्चांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे’, असे म्हणत त्यांनी पक्षाच्या मालकीचा प्रश्न आणि सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवर भाष्य केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून शरद पवार यांचे नाव पक्षाच्या स्थापनेपासूनच आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आणि त्यांच्यावर अन्याय झाला, असा दावा त्यांनी केला.
‘पक्ष शरद पवारांना परत मिळावा’
पक्षाच्या संविधानाचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकीसंदर्भातील लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अधिकाराने आणि न्यायाने पक्ष शरद पवारांना परत मिळावा, हीच आपली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही, तर संविधानाने चालतो. पक्ष परत मिळाल्यानंतर त्याचे काय करायचे, हा निर्णय शरद पवार घेतील. पक्ष कोणाला द्यायचा किंवा नेतृत्व कोणाकडे सोपवायचे, हे ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच असेल,’ असे सुळे यांनी म्हटले.
‘माझी लढाई फक्त शरद पवारांसाठी नाही’
पक्षाच्या मालकीसंदर्भातील न्यायालयीन लढाईचा उद्देश स्पष्ट करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांवर झालेला अन्याय भविष्यात कोणत्याही पक्षाच्या संस्थापकावर होऊ नये, यासाठी ही लढाई सुरू आहे.
‘ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने संविधानाची मोडतोड करून पक्ष काढून घेण्यात आला. शरद पवारांवर जो अन्याय झाला, तो भविष्यात दुसऱ्या कोणावरही होऊ नये, हाच या लढाईमागचा उद्देश आहे. कोणाचीही सत्ता कायमस्वरूपी नसते,’ असे त्यांनी सांगितले.
‘आमदार-खासदारांची संख्या हा एकमेव निकष नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकीचा निर्णय केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवर होऊ शकत नाही, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला. पक्षाचे संविधान, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाशी संबंधित अधिकृत कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडून आलेल्या लोकांची संख्या कदाचित शरद पवारांच्या विरोधात गेली असेल; मात्र पक्षाशी संबंधित कागदपत्रे पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शरद पवारांचा होता, आजही आहे आणि उद्याही त्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांवर सुळे यांनी थेट ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर न देता, आधी शरद पवारांना पक्ष न्यायाने परत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पक्षाचे काय करायचे, नेतृत्व कोणाकडे द्यायचे किंवा पुढील राजकीय दिशा काय असावी, याचा निर्णय शरद पवारच घेतील, अशी भूमिका स्पष्ट केली.
जरांगेंच्या उपोषणावरून सरकारवर निशाणा
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्याच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
महाराष्ट्रात प्रत्येक प्रश्नासाठी नागरिकांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून पेपरफुटीपर्यंत आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नापर्यंत विविध मुद्द्यांसाठी उपोषण करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘उपोषण केल्याशिवाय सरकार ऐकतच नाही,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App