विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलासोबत एका मोठ्या तेल कराराची घोषणा केली. हा करार जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या करारामुळे व्हेनेझुएलाच्या सुमारे ६५ अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेला नियंत्रण मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या कराराची माहिती दिली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी या करारासाठी वाटाघाटी केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
“अमेरिकेने नुकताच व्हेनेझुएलासोबत इतिहासातील सर्वात मोठा तेल करार केला आहे,” असा दावा ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.
या घोषणेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर देशांतर्गत पातळीवरही ऊर्जा आणि इंधनाच्या वाढत्या किमतींचा दबाव आहे. इराणमधील युद्धाला आता सहा महिने उलटले असून त्याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिंता कायम आहे. ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने आपल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधील तेलाचा वापरही सुरू केला आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला अमेरिकेचा हा साठा ३० कोटी बॅरलच्या खाली गेला. २०२६च्या सुरुवातीपासून या साठ्यात १० कोटी बॅरलपेक्षा अधिक घट झाली आहे.
दरम्यान, जानेवारीमध्ये निकोलस मादुरो यांना सत्तेतून हटवल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन तेल कंपन्यांना पुन्हा व्हेनेझुएलामध्ये आणण्याबाबत चर्चा केली होती. मादुरो यांना अमेरिकेत नेण्यात आले असून त्यांच्यावर नार्कोटेररिझम आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आरोपांवर फेडरल कारवाई सुरू आहे.
व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेलसाठा
व्हेनेझुएलाकडे अंदाजे ३०३ अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक तेलसाठा असलेल्या देशांमध्ये व्हेनेझुएलाचा समावेश होतो. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशननुसार, हा साठा जगातील एकूण तेलसाठ्याच्या सुमारे १७ टक्के आहे.
व्हेनेझुएलाचा बहुतांश तेलसाठा आधीच शोधून नकाशावर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या तेलसाठ्यांचा शोध घेण्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शोधमोहीम राबवावी लागत नाही. मात्र, देशातील तेल उत्पादनाची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात ढासळल्यामुळे या प्रचंड साठ्याचा पुरेपूर वापर करणे व्हेनेझुएलाला शक्य झालेले नाही.
सध्या व्हेनेझुएला जगातील एकूण तेल उत्पादनापैकी केवळ सुमारे १ टक्का तेलाचे उत्पादन करतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या या करारामुळे व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनाला चालना मिळते का आणि त्याचा जागतिक तेल बाजारावर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App