अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांचाच; राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्या नावांची चर्चा
विशेष प्रतिनिधी
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यानंतर आता सत्ताधारी गटात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीची उत्सुकता वाढली आहे. अध्यक्षपदासाठी चार प्रमुख ज्येष्ठ संचालकांच्या नावांची चर्चा सुरू असून, उपाध्यक्षपदासाठी तरुण संचालकांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही पदांवरील निवडीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे. Someshwar chairman
अध्यक्षपदासाठी चार नावांची चर्चा
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे, संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. या चौघांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे.
राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. संचालक म्हणून त्यांची ही चौथी टर्म असून, कारखान्याच्या कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाल्यास त्यांचे नाव महत्त्वाचे मानले जात आहे.
दुसरीकडे, प्रमोद काकडे यांच्याकडेही सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव आहे. त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले असून, कारखान्याच्या संचालकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही चर्चेत आहे.
दरम्यान, संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्या नावांचाही अध्यक्षपदासाठी विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनुभवी संचालकांपैकी कोणाला पसंती मिळते की वेगळ्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपाध्यक्षपदी तरुण नेतृत्वाला संधी?
अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पदासाठी अभिजित काकडे आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे. हे दोघेही दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत.
कारखान्याच्या नेतृत्वात तरुणांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास या दोघांपैकी एकाची उपाध्यक्षपदी वर्णी लागू शकते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अनुभवाला प्राधान्य दिले जाणार की नेतृत्वाच्या नव्या समीकरणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
निवडणुकीत सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यानंतर सत्ताधारी गटासमोर आता पदवाटपाचा महत्त्वाचा टप्पा आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करताना ज्येष्ठांचा अनुभव, संघटनात्मक काम आणि तरुण नेतृत्वाला संधी या बाबींचा विचार होण्याची शक्यता आहे.
मात्र, या पदांसाठी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार आणि उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याचे उत्तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यांच्या निर्णयाकडे आता सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App