विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिटची मागणी करणाऱ्या नगरसेवकांवरून महायुतीतील वाद अधिकच वाढल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांचाही विकासनिधी शून्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या कामांची चौकशी आणि ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली होती. या प्रस्तावावर सुहास टिंगरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या विकासनिधीबाबत निर्णय झाल्याने पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादीमधील संघर्षाला आणखी धार आली आहे.
निधी शून्य करण्यामागे प्रस्तावावरची सही?
सुहास टिंगरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, “चंद्रकांत पाटील यांच्या कामाची चौकशी करण्याच्या प्रस्तावावर मी अनुमोदक म्हणून सही केली होती. त्यामुळेच माझा विकासनिधी शून्य करण्यात आला असण्याची शक्यता आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
टिंगरे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपल्या प्रभागातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध निधीतून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
अजित पवारांचा दाखला देत टिंगरेंचा सवाल
आपली भूमिका स्पष्ट करताना सुहास टिंगरे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचा दाखला दिला. अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांच्या कार्यकाळातही विविध आरोप झाले, मात्र आरोप झाले म्हणून त्यांनी कोणत्याही आमदार किंवा खासदाराचा निधी रोखला नाही, असे टिंगरे यांनी म्हटले.
“माझ्याबद्दल वैयक्तिक आकस असेल तर तो वेगळा विषय आहे. मात्र, या निधीतून मला माझ्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांची कामे करायची होती,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधकाच्या भूमिकेत
राज्य आणि केंद्रात भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. मात्र, पुणे महापालिकेतील राजकीय समीकरण वेगळे असून येथे राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे, असे सुहास टिंगरे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे महायुतीचा राज्य पातळीवरील सत्तासहयोग कायम असला, तरी पुणे महापालिकेतील स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. आता विकासनिधीच्या मुद्द्यावरून हा वाद आणखी चिघळणार का, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App