वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला मोठे वळण; आरोपी बंडू फाटक यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे. फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांना पवना डॅम परिसरातील फार्महाऊसमध्ये आश्रय दिल्याचा आरोप बंडू फाटक यांच्यावर करण्यात आला होता.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे काही काळ फरार होते. या काळात त्यांनी पवना डॅम परिसरातील एका फार्महाऊसमध्ये आसरा घेतल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी रिसॉर्टचे मालक बंडू फाटक यांना या प्रकरणात सहआरोपी केले होते.

पुणे सत्र न्यायालयाने फाटक यांचा खटल्यातून डिस्चार्ज करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बंडू फाटक यांच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.



केवळ निवारा आणि जेवण दिल्याने ‘Harbouring’ ठरत नाही

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, एखाद्या फरार व्यक्तीला केवळ जेवण किंवा राहण्याची जागा उपलब्ध करून दिल्याने त्याच्यावर ‘Harbouring’चा गुन्हा आपोआप लागू होत नाही.

न्यायालयानेही याच मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. एखाद्या फरार आरोपीला निवारा किंवा जेवण दिले म्हणून संबंधित व्यक्ती मुख्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध होत नाही. त्या व्यक्तीला घडलेल्या गुन्ह्याची माहिती होती आणि ही माहिती असूनही त्याने जाणूनबुजून आरोपीला मदत केली, हे ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

केवळ संशयाच्या आधारे एखाद्या व्यक्तीला सहआरोपी करता येणार नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने बंडू फाटक यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.

वैष्णवी हगवणे प्रकरण नेमकं काय?

१६ मे २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे २३ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे वैष्णवींनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला होता.

या प्रकरणानंतर पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी राजेंद्र हगवणे हे काही काळ फरार होते. त्यांनी पवना डॅम परिसरातील फार्महाऊसमध्ये आश्रय घेतल्याचा आरोप करण्यात आला.

फरार आरोपीला राहण्यासाठी जागा आणि जेवण उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रिसॉर्ट मालक बंडू फाटक यांना सहआरोपी केले होते. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फाटक यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

Major turn in the Vaishnavi Hagvane suicide case; accused Bandu Phatak acquitted by the High Court.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात